सांस्कृतिक सभागृह बनले सार्वजनिक शौचालय
By Admin | Updated: December 28, 2016 01:52 IST2016-12-28T01:52:32+5:302016-12-28T01:52:32+5:30
एकीकडे शासन गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष योजना राबवित आहे. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे

सांस्कृतिक सभागृह बनले सार्वजनिक शौचालय
शासनाचा निधी व्यर्थ : प्रशासनाचे दुर्लक्ष, गाव हागणदारी मुक्त करण्याच्या योजनेचा बट्टयाभोळ
परिमल डोहणे ल्ल चंद्रपूर
एकीकडे शासन गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष योजना राबवित आहे. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सावली येथील चंद्रपूर-गडचिरोली या मुख्य मार्गावर असलेल्या सांस्कृतिक भवनाला सार्वजनिक शौचालयाचे रुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शासनाच्या गाव हागणदारी मुक्त करण्याच्या योजनेचा बट्टयाभोळ झाल्याचे दिसून येत आहे.
सावली येथे सन १९९९ साली माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या खासदार निधितंर्गत सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम नऊ लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आले. गावातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सदर सभागृहाचे बांधकाम करण्यात आले होते. त्यामाध्यमातून शासनाला राजस्वसुद्धा प्राप्त होणार होते. या सभागृहाला लागूनच दोन बाजूला दोन खोल्या, इलेक्ट्रीकची व्यवस्था, सिलींग फॅन इत्यादी सोई सुविधा करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणामुळे या सांस्कृतिक भवनाला घरघर लागली आहे.
भवनाच्या एका बाजूला सार्वजनिक मूत्रीघर आहे. मागील बाजूस शेती आहे. तर बाजूला मोकळी जागा आहे. या परिसरात आजूबाजूला कुठेही कचारा कुंडी नसल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. बाजूला मोकळी जागा असल्याने अनेकजण तीथे शौचास जातात. सभागृहाचा वाली कुणी नसल्याने चोरट्यानी सभागृहाचे दरवाजे तोडून येथील सर्व इलेक्टानिक वस्तू, सिलिंग फॅन लंपास केले. कालांतराने नागरिकांनी सभागृहातच जाऊन शौच करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदर सभागृहाला सार्वजनिक शौचालयाचे रुप आलेले आहे.
सदर सभागृहाची देखभाल पूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाकडे होती. त्यानंतर ते तहसील कार्यलयाकडे हस्तांतरीत करण्यात आले. तहसील कार्यालयाने स्पंदन या संस्थेला सभागृह हस्तांतरीत केले. स्पंदन या संस्थेतर्फे त्या सभागृहात व्यायमशाळा सुरु करण्यात येणार होती. मात्र त्यांना विरोध करण्यात आला. त्यामुळे पुन्हा त्यांची देखभाल तहसील कार्यालयाकडे आली. मात्र आजपर्यंतच्या एकही तहसीलदारांनी त्याकडे लक्ष दिले नाही. किंवा एकही पाहरेकरी नेमला नाही. त्यामुळे सदर सभागृह वाऱ्यावर आहे.
रुमाल बांधून मतदान
४सदर सभागृहाची तात्पुरती साफसाफाई करुन लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र म्हणून निवड करण्यात येत होती. यावेळी मतदार तथा अधिकारी नाकावर रुमाल बांधून मतदान करीत होते. मात्र काही कालवधीनंतर ते मतदान केंद्रही रद्द करण्यात आले.
सभागृहातील
साहित्य लंपास
४सदर सभागृहामध्ये इलेक्टिक फिटींग करुन सिलिंग फॅन व विजेची सोय केली होती. या सभागृहामध्ये २० च्या जवळपास सिलींग फॅन लावण्यात आले होते. मात्र या सभागृहाचा रखवाला कुणीही नसल्यामुळे चोरट्यांनी सभागृहातील सिलिंग फॅन व वीज बल्ब लंपास केले.
या संदर्भात तहसीलदार डी.एस. भोयर यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, आपण तहसीलदार पदाचा नव्यानेच पदभार स्वीकारला आहे. यामुळे या संदर्भात पूर्ण माहिती जाणून घेऊ. त्या सभागृहाला संरक्षण भींत नसल्यामुळे कोणीही सहज आत प्रवेश करु शकतो. त्यामुळे त्या सभागृहाला संरक्षण भीतीच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देउन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ते म्हणाले.