लोकानुनयासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2016 00:02 IST2016-08-17T00:02:51+5:302016-08-17T00:02:51+5:30
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या त्यांच्या तिसऱ्या भाषणात नवीन तसे काही नव्हते, अपवाद केवळ पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील अशांततेच्या उल्लेखाचा

लोकानुनयासाठी?
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या त्यांच्या तिसऱ्या भाषणात नवीन तसे काही नव्हते, अपवाद केवळ पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील अशांततेच्या उल्लेखाचा. तुम्ही सतत जम्मू-काश्मीरमधील अशांततेचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करता आणि काश्मीरी जनतेला स्वातंत्र्य हवे आहे म्हणून सतत गवगवा करता पण तुमच्या बलुचिस्तानात काय चालले आहे व तेथील जनतेच्या स्वातंत्र्याच्या मागणीचे काय, असा मोदी यांच्या भाषणाचा सूर होता. काश्मीर खोऱ्यात पाकिस्तान ढवळाढवळ करुन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा जो भारताचा आरोप आहे तसाच आरोप पाकिस्तानही भारतावर बलुचिस्तानसंबंधी करीत आहे आणि डॉ.मनमोहनसिंग पंतप्रधान असताना पाकिस्तानच्या या आरोपावर चर्चा करण्याची तयारी भारताने दाखविलीही होती. तथापि मोदींच्या सोमवारच्या भाषणातील बलुचिस्तानच्या संदर्भावर संपुआ सरकारमधील परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी खरमरीत प्रतिक्रिया देताना बलुचिस्तान हा पाकचा अंतर्गत प्रश्न आहे व त्यावर सार्वजनिक चर्चा करण्याने भारताच्या पाकव्याप्त काश्मीरवरील हक्कास बाधा पोहोचू शकते असे म्हणताक्षणी काँग्रेस पक्षाने खुर्शीद यांना एकाकी पाडून मोदींच्या कथनास पाठिंबा दिला आहे. बलुचिस्तान असो की पाकव्याप्त काश्मीर असो, पाकिस्तान त्या प्रांतात लष्कराचा वापर करुन लोकांच्या हक्कांची पायमल्ली करीत आहे व हा प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चर्चेस आणलाच गेला पाहिजे असे स्वच्छ भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली आहे. लोकव्यवहारात ज्याला ‘ठोशास ठोसा’ म्हणतात तसाच काहीसा प्रकार मोदींनी केला असला आणि त्याला काँग्रेसनेही पाठिंबा जाहीर केला असला तरी नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही महत्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये जे सौहार्द निर्माण झाल्याचे म्हटले जाते, त्याचा हा निश्चितच परिणाम नव्हे असा तज्ज्ञांचा अभिप्राय आहे. त्यामागे कारण आहे उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे. पाकिस्तानच्या विरोधात घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही भूमिकेचे शहरी आणि विशेषत: युवा वर्गातील मतदारांकडून स्वागत होत असते आणि त्यातच मग हिन्दू मतांचे अप्रत्यक्षरीत्या ध्रुवीकरणही होत असते. मोदी आणि भाजपा यांना ते अपेक्षितही असते. लोकानुनय त्यासाठीच असतो. पण आज काँगेसची स्थिती इतकी नाजूक बनली आहे की तिचे परंपरागत मतदार तिच्यापासून दूर गेले असल्याने तिलाही हिंदू मतांची ओढ लागली आहे.