शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध कराव्या
By Admin | Updated: October 9, 2015 01:45 IST2015-10-09T01:45:13+5:302015-10-09T01:45:13+5:30
वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा दौरा करून तेथे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सोई सुविधांचा अभ्यास करून

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध कराव्या
सुधीर मुनगंटीवार : उच्चस्तरीय बैठकीत दिले निर्देश
चंद्रपूर : वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा दौरा करून तेथे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सोई सुविधांचा अभ्यास करून तशा प्रकारच्या सोई सुविधा चंद्रपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने अहवाल सादर करण्याचे निर्देश वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
७ आॅक्टोबर रोजी चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरील निर्देश दिले. या बैठकीत त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा घेतला. वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडकडून महाविद्यालयाच्या बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाच्या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावा, महाविद्यालयाच्या ५० एकर जागेमध्ये वृक्षारोपण करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा, रुग्णसेवेसाठी लागणारी अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देत ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र बल्लारपूर अद्ययावत करावे, विद्यार्थ्यांसाठी टी.बी. हॉस्पिटल परिसरात वसतिगृहाचे बांधकाम करण्याबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर कारावा, अंबेजोगाई, धुळे , नांदेड व यवतमाळप्रमाणे चंद्रपूर येथील अध्यापकांना वेतनामध्ये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. चंद्रपूर येथील महाविद्यालयामध्ये वरिष्ठ निवासी अधिकारी व टयुटर यांच्या वेतनामधील तफावत दूर करावी, टी.बी. हॉस्पिटलसाठी पर्यायी इमारत बांधून देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
या बैठकीला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, संचालक आरोग्य डॉ सतीश पवार, अधिष्ठाता डॉ. मोरे, चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर , वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक मिश्रा, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जयस्वाल तसेच वैद्यकीय विभागाचे संबधित अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)