विभक्त कुटुबांना स्वतंत्र विद्युत मीटर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:53+5:302021-07-21T04:19:53+5:30
चंद्रपूर : विद्युत बिलावरून कुटुंबा-कुटुंबात होणारे वाद टाळण्यासाठी विभक्त झालेल्या कुटुंबांना वेगळी विद्युत जोडणी देत स्वतंत्र मीटर देण्यात यावेत, ...

विभक्त कुटुबांना स्वतंत्र विद्युत मीटर द्या
चंद्रपूर : विद्युत बिलावरून कुटुंबा-कुटुंबात होणारे वाद टाळण्यासाठी विभक्त झालेल्या कुटुंबांना वेगळी विद्युत जोडणी देत स्वतंत्र मीटर देण्यात यावेत, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांना केल्या आहेत. त्यांनीसुद्धा गॅस कनेक्शनच्या आधारे विभक्त कुटुबांना स्वतंत्र मीटर देण्याचे आश्वासन दिले आहे.
जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीडीसीअंतर्गत प्रस्तावित कामांची माहिती जाणून घेण्यासाठी व महावितरण संदर्भातील विविध तक्रारींचे निराकरण करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या आहेत. या बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, कार्यकारी अभियंता फरास खाणेवाला, वसंत हेडाऊ, अरुण मानकर, साहील डाखरे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला संघटिका वंदना हातगावकर, संघटक कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, सायली येरणे, आशा देशमूख, राशिद हुसेन, विलास वनकर, मुन्ना जोगी, नकुल वासमवार आदींची उपस्थिती होती.
एका घरी विद्युत मीटर असल्यामुळे कुटुंबा-कुटुंबांमध्ये विद्युत बिलाच्या मुद्यावरून नेहमी वाद होत असल्याचे दिसून येते. परिणामी विभक्त कुटुंबाला वेगळा मीटर जोडणी देण्याच्या अनेक मागण्या कार्यालयात प्राप्त झाल्या असल्याचे या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरणच्या लक्षात आणून देत विभक्त झालेल्या कुटुंबाला वेगळे मीटर देण्याच्या सूचना केल्या. तसेच भाडेकरूंसाठीही स्वतंत्र मीटर देण्याच्या प्रक्रियेतील जाचक अटी शिथिल कराव्या, रस्त्याच्या मध्यभागातील विद्युत खांब काढण्यात यावेत, विद्युत पुरवठा खंडित करण्याअगोदर त्यांना पूर्वसूचना देत देयक अदा करण्यासाठी तीन टप्पे आखून देण्याच्या सूचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत.