नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:29+5:30
शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे होऊनही अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत राज्य शासनाने देण्याची मागणी माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत कपात सूचनेच्या माध्यमातून केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे होऊनही अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत राज्य शासनाने देण्याची मागणी माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत कपात सूचनेच्या माध्यमातून केली.
गुरुवारी महसूल व वनविभागावरील पुरवणी मागण्यांवरील चर्चेत वरील विषयांच्या अनुषंगाने कपात सूचनांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. नद्यांशेजारील गावांमध्ये सातत्याने निर्माण होणारी पुरपरिस्थिती लक्षात घेता या गावांमध्ये आपत्ती यवस्थापनाच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन कक्ष उघडण्याची मागणी त्यांनी केली आहे. नगरविकास विभागावरील पुरवणी मागण्यांवर दाखल केलेल्या कपात सूचनेच्या अनुषंगाने आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या माता महाकाली देवस्थानाच्या सौंदर्यीकरणासाठी मंजूर ६० कोटी रुपयांच्या निधींतर्गत विकासकामांना त्वरित सुरुवात करावी, अशी मागणी केली. ही मागणी मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होईल.