मंजूर आरोग्य केंद्राना तातडीने निधी द्यावा

By Admin | Updated: August 17, 2016 00:39 IST2016-08-17T00:39:20+5:302016-08-17T00:39:20+5:30

कोरपना, गोंडपिंपरी, राजुरा व जिवती तालुक्यातील मंजूर झालेल्या चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांना कार्यान्वित ...

Provide immediate funds to the sanctioned health center | मंजूर आरोग्य केंद्राना तातडीने निधी द्यावा

मंजूर आरोग्य केंद्राना तातडीने निधी द्यावा

वामनराव चटप : आरोग्य मंत्र्यांना निवेदन
राजुरा : कोरपना, गोंडपिंपरी, राजुरा व जिवती तालुक्यातील मंजूर झालेल्या चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांना कार्यान्वित करण्यासाठी तसेच इमारत बांधकामाकरिता आरोग्य संचालनालयाकडून प्रस्ताव मागून तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा हा भाग दुर्गम व आदिवासी उपयोजना क्षेत्रातील असून या भागात कुपोषणासह आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. महाराष्ट्र शासनाने सन २००१ च्या लोकसंख्येच्या निकषावर या दुर्गम व आदिवासी क्षेत्रातील आरोग्याच्या अपुऱ्या सोई असल्याने खास बाब म्हणून चार आरोग्य केंद्रांना राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णय १७ जानेवारी २०१३ नुसार मंजुरी दिली. यात कोरपना तालुक्यातील नांदा (बिबी), राजुरा तालुक्यातील विरुर (स्टेशन), गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी व जिवती तालुक्यातील शेणगाव या प्राथमिक स्वास्थ केंद्राचा समावेश आहे.
ही सर्व केंद्रे मंजूर होवून अडीच वर्षाचा काळ लोटला आहे. परंतु अद्यापही या चारही स्वास्थ्य केंद्राना निधी प्राप्त होवूनही सुरुवात झालेली नाही. राजुरा तालुक्यात जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने शैक्षणिक पात्रता नसलेल्या व गैरकायदेशिर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडून उपचार घेतल्याने राजुरा तालुक्यातील कोष्टाळा- लक्कडकोट गावात तीन महिलांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या एक वर्षांपासून माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप ही सर्व आरोग्य केंद्र कार्यान्वित व्हावीत म्हणून प्रयत्नशिल आहेत. जि.प.चे समाजकल्याण सभापती निलंकठ कोरांगे व कोरपना पंचायत समितीचे सभापती रविंद्र गोखरे यांनीही आरोग्य सेवा संचालकाकडे पत्र पाठवून मागणी केली होती. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने याची दखल घेवून तातडीने नांदा (बिबी), विरुर (स्टेशन), शेणगाव व भंगाराम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना निधी उपलब्ध करुन ती तातडीने सुरू करावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. डॉ. दीपक सावंत यांच्याकडे अ‍ॅड. चपट यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Provide immediate funds to the sanctioned health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.