कविता कन्नाकेच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाईसाठी कोठारीत निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:35 IST2021-07-07T04:35:27+5:302021-07-07T04:35:27+5:30
प्रेयसीसाठी गंगाधर कन्नाने याने कट रचून पत्नी कविता कन्नाकेची निर्घृण हत्या केली. दि. ३० जूनच्या रात्री गंगाधर व त्याची ...

कविता कन्नाकेच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाईसाठी कोठारीत निषेध मोर्चा
प्रेयसीसाठी गंगाधर कन्नाने याने कट रचून पत्नी कविता कन्नाकेची निर्घृण हत्या केली. दि. ३० जूनच्या रात्री गंगाधर व त्याची नऊ महिन्यांची गरोदर पत्नी कविता ही मंडळी चिमूरहून कोठारीकडे येत होते. गंगाधरने कोठारी व दहेली येथील आपल्या दोन मित्रांना उमरी फाट्यावर बोलावून कवडजई रस्त्यावरील पुलाजवळ कविताची हत्या केली. रानटी डुकराने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला, असे नाट्य रचून घरी कविताचा मृतदेह आणला. नातेवाइकांना बोलाविले. मृतदेह बघून नातेवाइकांना संशय येताच कोठारी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केल्याने गंगाधरचे बिंग फुटले. पोलिसांनी कविताचा पती गंगाधर कन्नाके, राजकुमार कन्नाके व शंकर गंधमवार यांना अटक केली. मृतक कविता नऊ महिन्यांची गरोदर होती. तिला दोन वर्षांची मुलगी आहे. काही दिवसांतच ती बाळाला जन्म देणार होती. अशा अवस्थेत तिला दुचाकीवर बसवून नेले आणि त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, महिलांच्या अस्मितेला धोका निर्माण करणारी घटना आहे. अशा विकृत मानसिकतेच्या मारेकऱ्यांना माफी नकोच. त्यांना कडक शिक्षा व्हावी, ही समाजमनाची मागणी आहे. या प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास करून कविताला न्याय द्यावा, अशी मागणी करीत मोर्चा कोठारीतील आनंदनगर येथून पोलीस ठाण्यावर निघाला.
मोर्चाचे नेतृत्व वैशाली बुद्दलवार, अल्काताई आत्राम, रेणुका दुधे यांनी केले. ग्रा. पं. सदस्य स्नेहल टिम्बडिया, शोभाताई वडघणे, सुचिता गाले, अल्पोन्सा परचकेंसह शेकडो महिला, पुरुष मोर्चात सहभागी झाले होते. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार कुळसंगे, ठाणेदार तुषार चव्हाण, तलाठी महादेव कन्नाके यांना देण्यात आले.