जिवती तहसीलसमोर तिसऱ्या दिवशीही धरणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:52+5:302021-02-05T07:37:52+5:30
न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क जिवती : येथील तहसील कार्यालयासमोर २३ जानेवारीपासून सुरू असलेल्या ‘लोकस्वराज्य ...

जिवती तहसीलसमोर तिसऱ्या दिवशीही धरणे सुरूच
न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : येथील तहसील कार्यालयासमोर २३ जानेवारीपासून सुरू असलेल्या ‘लोकस्वराज्य आंदोलन’द्वारा आयोजित धरणे आंदोलनाचा सोमवारी तिसरा दिवस असून, या आंदोलनाला विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध व सामाजिक समस्यांना वाचा फोडण्यासाठी हे धरणे आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला गोंडवाना गणतंत्र पार्टी व भारतीय मुस्लिम परिषद, जिवती यांनी आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली. सोमवारी आंदोलनाचा तिसरा दिवस असूनही शासन स्तरावर याची कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही.
या धरणे आंदोलनातील मागण्यांमध्ये ९ डिसेंबर २०२०ला नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरात राहणाऱ्या सुनीता नभाजी कुडके या मुलीवर बलात्कार करून तिला ठेचून मारणाऱ्यांना तत्काळ अटक करून कारवाई करावी, अनुसूचित आरक्षणात अ, ब, क, ड वर्गीकरण करण्यात यावे, लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, जिवती तालुक्यात स्थलांतरित झालेल्या गैर आदिवासींना विशेष बाब म्हणून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, जिवती येथील शासकीय रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, जिवती तालुक्यातील बेरोजगारांसाठी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, जिवती तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांसंदर्भात न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. दत्तराज गायकवाड यांनी दिला आहे.