गडबोरी गावाचे संरक्षण अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST2021-02-05T07:38:03+5:302021-02-05T07:38:03+5:30
वासेरा : मागील वर्षी जून महिन्यामध्ये गडबोरी येथील एका नऊ महिन्याच्या स्वराज नामक मुलाला घरातून उचलून नेऊन बिबट्याने ठार ...

गडबोरी गावाचे संरक्षण अंधारात
वासेरा :
मागील वर्षी जून महिन्यामध्ये गडबोरी येथील एका नऊ महिन्याच्या स्वराज नामक मुलाला घरातून उचलून नेऊन बिबट्याने ठार केले होते. याच महिन्यात एका ६५ वर्षीय महिलेला वाघाने घरातून झोपेतच उचलून ठार केले होते. त्यानंतर वनविभागाने गावाच्या सभोवताल ५० सौर दिव्यांची व्यवस्था केली होती. मात्र आता हे सर्व दिवे बंद असल्याने गावाची सुरक्षा पुन्हा धोक्यात आली आहे.
गडबोरी हे गाव डोंगरपायथ्याशी असून, गावाच्या सभोवताल वाघ, बिबट्यांचा संचार आहे. त्यामुळे नागरिक कायम दहशतीत असतात. मागील वर्षी सौर दिवे लावले, मात्र आता ते बंद अवस्थेत आहेत. आठ महिन्यांपासून दिवे बंद असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
वनपरिक्षेत्र कार्यालय सिंदेवाही अंतर्गत गडबोरी गाव येत असून, गावाच्या सभोवताल वाघ, बिबट्यांची दहशत अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांना शेतात जाणेसुद्धा मुश्कील झाले आहे. नागरिकांना वाघ, बिबट्याचे दर्शन हाेतेे. सौर दिवे बंद असल्यामुळे नागरिकांना रात्री बाहेर फिरणे अवघड झाले आहे. गावात वाघ बिबटे कधी घुसेल याचा नेम नाही. वनविभागाने गट बोरी सभोवताल लावलेले सौर दिवे दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मागील वर्षी गट बोरी येथील दोघांचे बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गेले होते. तेव्हा वनविभागाने ग्रामस्थांना आश्वासन दिले होते की गावाच्या सभोवताल तारेचे कुंपण करून देऊ, पण ते आश्वासन फोल ठरल्याचे दिसत आहे.