अधिकाऱ्यांच्या बदलीचे प्रस्ताव

By Admin | Updated: May 23, 2017 00:34 IST2017-05-23T00:34:50+5:302017-05-23T00:34:50+5:30

मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चित ठेवणे, ई-लर्निंग यासह अन्य काही कारणांचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.

Proposals for transfer of officers | अधिकाऱ्यांच्या बदलीचे प्रस्ताव

अधिकाऱ्यांच्या बदलीचे प्रस्ताव

कामात हयगय : ई-लर्निंग, अखर्चित निधी कारणीभूत
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मोठ्या प्रमाणावर निधी अखर्चित ठेवणे, ई-लर्निंग यासह अन्य काही कारणांचा ठपका ठेवून जिल्हा परिषदेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. यात समाजकल्याण, सिंचन, पाणीपुरवठा आणि शिक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील एका अधिकाऱ्यास महिन्याभरापासून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले, तर एक अधिकारी सेवानिवृत्ती घेण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. एकाचवेळी पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या प्रस्तावाने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.
स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळा मागे पडल्या आहेत. या शाळांचा चेहरामोहरा बदलविण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला. कॉन्व्हेंटच्या धर्तीवर जिल्हा परिषद शाळांत ई-लर्निंगची व्यवस्था त्यांनी करून दिली होती. त्यासाठी कोट्यवधींचा निधी त्यांनी मंजूर करवून दिला होता. जिल्हा परिषदेच्या १७९४ शाळा आहेत. टप्प्याटप्प्यात या शाळांत ई-लर्निंगची सोय करून देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाकडे होती. मात्र, याच विभागाने या कामात हयगय केली होती. वारंवार निर्देश, सूचना दिल्यानंतर त्याची पाहिजे तशी अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे ई-लर्निंगचे काम पडत गेले होते. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देवेंद्र सिंह यांनी याच मुद्याला घेऊन शिक्षण विभागाचे अधिकारी गारकर यांना चांगलेच धारेवर धरले होते. याच कारणामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. अजूनही ते रुजू झाले नाही.
समाजकल्याण विभागाच्या अनेक योजना आहेत. अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याचे समाजकल्याण अधिकारी आत्राम मागे पडल्या. या विभागाकडे तब्बल ४ कोटींचा निधी अखर्चिक राहिला. हा निधी त्यांनी मुदतीत खर्च केला नाही. अनेक लाभार्थ्यांना साहित्यही वाटप करण्यात आले नसल्याचे प्रकार या विभागातून उजेडात आला होता. सिंचन विभागाचा एक कोटी ७५ लाखांचा निधी अखर्चिक राहिला. विहिरी, शेततळे यासह अन्य कामे या विभागाच्या दिरंगाईमुळे मागे पडली होती. त्यामुळे या विभागाचे कार्यकारी अभियंता सहारे यांना धारेवर धरण्यात आले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रागडे यांच्या कार्यकाळात अनेक योजना अपूर्ण राहिल्या.
नळयोजनांसाठी निधी येऊनही त्यांनी तो खर्च केला नाही. त्यामुळे मधल्या काळात तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांनी या विभागातील अनेक अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या होत्या. कामात हयगय आणि अखर्चिंक निधीचा मुद्दा उपस्थित करून सिंह यांनी बदलीचे प्रस्ताव तयार केले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनीही अखर्चिक निधीचा मुद्दा गांभीर्याने घेतला. अखर्चिक निधीमुळे अनेक योजना जिल्हा परिषदेला पाहिजे तथा राबविता आल्या नाही. अनेक लाभार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी या पाच अधिकाऱ्यांच्या बदलीचे प्रस्ताव पाठविले असल्याचे माहिती आहे.

अधिकारी बदलीच्या प्रयत्नात
जिल्हा परिषदेतील अनेक अधिकाऱ्यांचा कार्यकाळ आता संपुष्टात आला आहे. काहींचा कार्यकाळ अजूनही शिल्लक आहे. मात्र, जिल्हा परिषदेत काम करण्याची इच्छा नसल्याने कार्यकाळ शिल्लक असलेले काही अधिकारी बदलीच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहे. लवकरच बदलीचे सत्र सुरू होणार आहे.

Web Title: Proposals for transfer of officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.