१०० खाटांचा श्रेणी वर्धन प्रस्ताव धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 05:00 AM2021-10-24T05:00:00+5:302021-10-24T05:00:51+5:30

राजू गेडाम  लोकमत न्यूज नेटवर्क मूल : रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मूल तालुक्याबरोबरच जवळपास असलेल्या सावली, सिंदेवाही व ...

Proposal to increase the range of 100 beds in the dust | १०० खाटांचा श्रेणी वर्धन प्रस्ताव धूळखात

१०० खाटांचा श्रेणी वर्धन प्रस्ताव धूळखात

Next

राजू गेडाम 
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मूल तालुक्याबरोबरच जवळपास असलेल्या सावली, सिंदेवाही व पोंभूर्णा तालुक्यातील जनतेलादेखील सोयीचे व्हावे, या उद्देशाने उपजिल्हा रुग्णालय मूल येथील रुग्णालयाला श्रेणी वर्धन करून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यासंदर्भात ३१ जानेवारी २०१२ ला  विशेष बाब म्हणून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. तब्बल नऊ वर्षांचा कालावधी लोटत असतानादेखील हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत धूळखात पडला आहे. १०० खाटांचे श्रेणी वर्धन उपजिल्हा रुग्णालय होण्याच्या दृष्टीने योग्य पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे मत आता व्यक्त केले जात आहे.
उपजिल्हा रुग्णालय मूल येथे असलेल्या  ५० खाटांच्या रुग्णालयाचे रूपांतर १०० खाटांमध्ये  करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे  वैद्यकीय अधीक्षक मूल यांनी जिल्हा शल्यचिकित्सक चंद्रपूर यांच्या मार्फतीने मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला. मात्र, १०० खाटांचा प्रस्ताव आजही धूळखात असल्याचे दिसून येते. 
लोकसंख्या वाढतच असून आजच्या स्थितीत मूल तालुक्याची लोकसंख्या एक लाख १४ हजार ६११ आहे.  मूल तालुक्यासह  परिसरातील सावली, सिंदेवाही व पोंभूर्णा तालुक्यांची एकूण लोकसंख्या ४ लाख ६४ हजार ५३६ आहे.  ही बाब लक्षात घेता मूल येथे १०० खाटाचे श्रेणी वर्धन उपजिल्हा रुग्णालय स्थापन होणे गरजेचे आहे. ही मागणी करण्यात आली, त्यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी १ मार्च २०१२ ला उपसंचालक आरोग्यसेवा नागपूर यांना पत्र पाठवून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याविषयी १६ मुद्द्यांसह संचालनालय मुंबईला प्रस्ताव सादर करण्याविषयी कळविले होते. तेव्हा उपसंचालकांनी सविस्तर प्रस्ताव १९ मार्च २०१२ ला प्रस्ताव सादर केला होता. मात्र, हा प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे. 

आरोग्यमंत्री सकारात्मक
मूल येथील १०० खाटांच्या वाढीव उपजिल्हा रुग्णालयाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली असता याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्तावाबाबत सविस्तर कळवावे, जेणेकरून मान्यता देणे सोयीचे होईल, असे म्हटले आहे. मूल तालुक्यात जनतेच्या हितासाठी १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणे गरजेचे आहे. रुग्णालय झाल्यास वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वाढतील. त्याचबरोबर वैद्यकीय सेवेला बळ मिळू शकते. याकडे आपण विशेष लक्ष घालणार असल्याचे माजी आमदार देवराव भांडेकर यांनी सांगितले.

 

Web Title: Proposal to increase the range of 100 beds in the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app