पिकांच्या नुकसानीनंतर वेकोलिकडून कार्यवाही

By Admin | Updated: May 5, 2016 01:33 IST2016-05-05T01:33:05+5:302016-05-05T01:33:05+5:30

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत चिचोली नाल्याच्या नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना बॅकवॉटरचा फटका बसत होता.

Proceedings from the WakeLogin after the loss of crops | पिकांच्या नुकसानीनंतर वेकोलिकडून कार्यवाही

पिकांच्या नुकसानीनंतर वेकोलिकडून कार्यवाही

तक्रारीनंतर खोलीकरण : अरुंद नाल्यामुळेच बॅकवॉटरचा फटका
बल्लारपूर : बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत चिचोली नाल्याच्या नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना बॅकवॉटरचा फटका बसत होता. गेल्या काही वर्षांपासून शेतीचेही नुकसान होत आहे. वारंवार वेकोलि व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर वेकोलिने चिचोली गोवरी नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. यापूर्वीच हे काम केले असते तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले नसते. पिकांच्या नुकसानीनंतर वेकोलिला जाग आल्यामुळे नाला खोलीकरणाची प्रक्रिया सुरु केली असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
बल्लारपूर वेकोलि अंतर्गत चिचोली नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलविण्यात आला होता. वेकोलि प्रबंधकांनी शासनास दाखविलेल्या नकाशाप्रमाणे नाल्यांची रुंदी ४० ते ५० मीटर ठेवायला पाहिजे होती. मात्र, तलाठ्याने केलेल्या मोका चौकशीनुसार नाल्याची रुंदी २७ ते ३० मीटर इतकीच दिसून आली. शिवाय मागील वर्षी नाल्यातील गाळ काढण्याची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली नव्हती. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये उपविभागीय अधिकाऱ्यांनी मोका चौकशी केली. प्रत्यक्ष मोका चौकशीनंतर वेकोलिचे पितळ उघड पडले. शासकीय नियमाप्रमाणे नाला खोलीकरण करण्यात यावे, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी वेकोलि प्रशासनास पत्र दिले होते. प्रशासनाच्या दणक्यानंतर वेकोलि अधिकाऱ्यांची झोप उडाली. यावर्षी पावसाळ्यापूर्वीच चिंचोली- गोवरी नाल्याचे रुंदीकरण आणि गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.
मागील वर्षी गोवरी नाल्याच्या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली. मदतीसाठी शेतकऱ्यांनी शासनाकडे धाव घेतली. मात्र, वेकोलिने कुठलीही नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकरी व वेकोलिच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यानंतर शेतकऱ्यांचा समस्या ऐकून घेतल्या.
वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी शासनाला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष कुठलेच काम झाले नसल्याची माहिती पुढे आली. नाला वळविताना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी नाल्याची रुंदी ४० ते ५० मीटर असणे आवश्यक आहे.
वेकोलिने नाला खोलीकरणाचे काम करण्यापूर्वी मुख्य अभियंता जलसंधारण विभाग नागपूर यांच्याकडून परवानगीपत्र घेतले आहे. या पत्रात नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलल्यानंतर परवानगी पत्रानुसार कामे झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर शासनाने केलेल्या मोका चौकशीतही मोठी तफावत आढळून आली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Proceedings from the WakeLogin after the loss of crops