विभागीय कृषी संचालकापुढे शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या
By Admin | Updated: November 9, 2014 22:30 IST2014-11-09T22:30:12+5:302014-11-09T22:30:12+5:30
पोंभूर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी उशीरा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धान पिकांना प्रचंड झळ बसली. धान पीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांचे धान

विभागीय कृषी संचालकापुढे शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या
देवाडा खुर्द : पोंभूर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी उशीरा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धान पिकांना प्रचंड झळ बसली. धान पीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांचे धान पीक सुकत आहेत. धान पिकाचे तणस झाले असून जगायचे तर कसे असा प्रश्न निराश झालेल्या शेतकऱ्यांनी नागपूरचे विभागीय कृषी सह संचालक यांना केला.
विभागीय कृषी सह संचालक नागपूर यांनी आपल्या पथकासह शुक्रवारी पोंभूर्णा तालुक्याला भेट देऊन धानपिक परिसराची पाहणी केली. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडल्या. यावेळी विभागीय कृषी सह संचालक डॉ. विजय धावटे, विभागीय कृषी अधिकारी सलोदे, जिल्हा कृषी अधीक्षक हसना चहांदे, उपविभागीय कृषी अधिकारी बानोडे यांची उपस्थिती होती.
कृषी अधिकाऱ्यांचे पथक ७ नोव्हेंबरला पोंभूर्णा तालुक्यामध्ये दाखल झाले. सर्व प्रथम या पथकाने मुल-पोंभूर्णा मार्गावरील जामतुकूम परिसरातील शेतशिवाराला भेट देऊन ेपावसाअभावी सुकलेल्या धानपिकांची पाहणी केली. यावेळी डॉ. विजय धावटे यांनी शेतावर उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. परिसर पाहणी केल्यानंतर या परिसरात धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांनी मान्य केले. झालेल्या नुकसान संदर्भात आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या अनेक व्यथा मांडल्या आणि या परिसरामध्ये सिंचनाची सोय नसल्याने गेल्या अनेक वर्षापासून परंपरागत मामा तलाव, शेतबोडी, विहीर नाले यांचेवर अवलंबून शेतीचे उत्पादन घ्यावे लागत आहे. त्यामुळे अपुऱ्या सिंचन व्यवस्थेमुळे परिसरामध्ये सतत नापिकी येत असल्याचे सांगितले. यावेळी तालुका कृषी अधिकारी भाष्कर गायकवाड, पं.स. सदस्या रिनाताई बोधळकर, मंडळ अधिकारी काळे, कृषी सहाय्यक ताळे, पेंदोर व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)