अपुऱ्या पोलीस बळाने अनेक अडचणी
By Admin | Updated: March 22, 2015 00:09 IST2015-03-22T00:09:11+5:302015-03-22T00:09:11+5:30
तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यांतर्गत १०२ गावांचा समावेश असून या गावांतील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी केवळ ३४ कर्मचाऱ्यांवर

अपुऱ्या पोलीस बळाने अनेक अडचणी
वरोरा : तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यांतर्गत १०२ गावांचा समावेश असून या गावांतील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी केवळ ३४ कर्मचाऱ्यांवर असल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक आहेत. आहे. परिणामी गुन्हेगारही शिरजोर बनत असून गुन्हा घडल्यानंतरही पोलीस घटनास्थळी पोहोचू शकत नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.
वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यामध्ये १०२ गावांचा समावेश आहे. शेगावपासून अनेक गावे २५ ते ३० किलोमिटर अंतरापर्यंत आहे. शेगाव पोलीस ठाण्यात केवळ एकच वाहन आहे. या पोलीस ठाण्याअंतर्गत वरोरा, चिमूर तसेच शेगाव, चंदनखेडा भद्रावती या मुख्य मार्गावरील अपघात, वाहतूक विस्कळीत होणे यासोबतच भटाळा व रामदेगी पर्यटनस्थळी भरणाऱ्या जत्रेतही शेगाव पोलिसांनाच बंदोबस्त करावा लागत आहे.
येथे कार्यरत ३४ कर्मचाऱ्यांमध्ये एक सहाय्यक पोलीस अधिकारी, आठ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व उर्वरीत पोलीस कर्मचारी कार्यरत असून, पोलीस उपनिरीक्षकाचे पद रिक्त आहे.
पोलीस ठाण्याच्या स्थापनेपासून पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित केली गेली आहे. सध्या बदलत्या काळात वाढलेली लोकसंख्या, गुन्ह्याचे नवीन नवीन तंत्र गुन्हेगारांनी विकसित केले आहे. गावामधील तंट्याचे प्रमाणे वाढले आहे. त्यामुळे एका-एका कर्मचाऱ्यावर अनेक गावांचा भार देण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांची कर्तव्य बजावित असताना चांगलीच अडचण वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावालगत ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे.
या प्रकल्पातील वन्य प्राणी विशेषत: वाघ गावात येण्याच्या घटना घडत असतात. वाघ बघण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने कायदा व सुव्यवस्था बघण्याची जबाबदारी शेगाव पोलिसांना पार पाडाखी लागते. कामाच्या व्यापामुळे नागरिकांचे कामेही प्रलंबित राहत असतात. त्यामुळे शेगाव पोलीस ठाण्यात पोलीस बळ वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)