रस्ते, नाल्या, क्रीडांगणाची समस्या कायम
By Admin | Updated: November 8, 2014 22:35 IST2014-11-08T22:35:17+5:302014-11-08T22:35:17+5:30
राजुरा-कोरपना रस्त्यावरील वनसडी गावामध्ये अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. स्थानिक प्रशासन तथा पदाधिकाऱ्यांनी गावातील समस्या सोडविण्याकडे कायम दुर्लक्ष केले आहे.

रस्ते, नाल्या, क्रीडांगणाची समस्या कायम
वनसडी : राजुरा-कोरपना रस्त्यावरील वनसडी गावामध्ये अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. स्थानिक प्रशासन तथा पदाधिकाऱ्यांनी गावातील समस्या सोडविण्याकडे कायम दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रस्ते, नाल्या, पथदिवे नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
निजामकाळापासूनच वैभव संपन्न गाव म्हणून ‘वनसडी’ची ओळख आहे. मात्र येथील समस्यांमध्ये गावातील गतवैभव आता धोक्यात आले आहे. आजघडीला मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गासाठी निधी मंजूर आहे. प्रत्यक्षात कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. गावात धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील नाल्या तुंबल्या आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहते आहे. बहुतांश ठिकाणी पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारातून रस्ता शोधावा लागतो. देशात स्वच्छ भारत अभियान चालू असले तरी येथे मात्र स्वच्छतेचे तिनतेरा वाजले आहे. येथील पिपर्डा मार्ग, वनवसाहत रस्ता, मुख्य मार्गावर अनेक नागरिक उघड्यावरच शौचास बसतात. त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्घंधी पसरली आहे. गावात कुठेच सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने हागणदारी व मुतारीची समस्या आहे. पावसाळ्यात चिखलमय रस्ते व तुंबलेल्या गटारीमुळे समस्या अधिकच गंभीर होते. मात्र याकडे लक्ष देण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडे वेळ नसल्याचे चित्र आहे. राजुरा-कोरपना या महामार्गावर भरणारा बाजार स्थलांतरित करण्यात आला. परंतु बाजारासाठी ओटे अद्यापही तयार करण्यात आले नाही. यामुळे व्यावसायिकांना जमिनीवरच आपली दुकाने थाटावे लागते.
येथील मटण मार्केटसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली. मात्र गावात कुठेच कचरापेट्या लावण्यात आल्या नसल्याने रस्त्यावरच संपूर्ण कचरा विखुरलेला असतो. गावातील अस्वच्छ वातावरणामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहे. येथील ग्राम पंचायत परिसरातही झुडपे वाढली आहे. बँक आॅफ इंडिया शाखा, एटीएम, वनविभाग कार्यालय, आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी, गोडावून, उपडाकघर, आयुर्वेदिक रुग्णालय, टेलिफोन एक्सचेंज, शाळा आदी महत्त्वाची कार्यालये येथे आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक येथे मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे येथे सुसज्ज बसस्थानक क्रीडांगण, महामार्गाचे सौंदर्यकरण, सार्वजनिक स्वच्छतागृह, सामाजिक सभागृह, वाचनालय, कृषी विद्यालय स्थापन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विश्रामगृहाची देखभाल व दुरुस्ती, गावातील अंतर्गत चौकाचे नामांतर व सुशोभीकरण करणेही गरजेचे आहे. गावातील बहुतांश नागरिकांचा शेती व्यवसाय आहे. सोबतच राजुरा-कोरपना या मार्गावर हे गाव असल्याने दळणवळणाच्या सोयी येथे उपलब्ध आहे. त्यामुळे शेती उत्पादनावर आधारित उद्योग येथे उभारल्यास बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकते. या समस्याकडे जातीने लक्ष देऊन स्थानिक प्रशासन व तालुका प्रशासनानी समस्या मार्गी लावावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस राकेश राठोड यांनी केली आहे. (वार्ताहर)