१० हजार ८०० रिक्षाचालकांच्या ‘रोटी’चा प्रश्न मिटणार इतरांचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:27 IST2021-04-15T04:27:23+5:302021-04-15T04:27:23+5:30
कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक झाल्याने राज्य सरकारने बुधवारपासून संचारबंदी लागू केली. जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ...

१० हजार ८०० रिक्षाचालकांच्या ‘रोटी’चा प्रश्न मिटणार इतरांचे काय?
कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक झाल्याने राज्य सरकारने बुधवारपासून संचारबंदी लागू केली. जीवनावश्यक वस्तू व औषधांची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू आहे. परंतु, संचारबंदीमुळे रिक्षाचालकांना ग्राहक मिळणार नाही. त्यांच्या उदरनिर्वाहाच्या समस्या निर्माण होतील, यासाठी परवानाधारक रिक्षाचालकांना दीडहजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. या मदतीमुळे रिक्षाचालकांना थोडा दिलासा मिळतो. पण, हातावर पोट असणाऱ्या इतर असंघटितांचे काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. चंद्रपुरात केवळ ३ हजार ६०० परवानाधारक रिक्षाचालक आहेत. शेकडो रिक्षाचालक इतरांची रिक्षा भाड्याने चालवितात. त्यांना या मदतीचा लाभ मिळणार नाही.
कोट
संचारबंदीच्या काळात रिक्षाचालकांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. मात्र, दीडहजाराची रक्कम अतिशय अल्प आहे. कोरोनामुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय बुडाला. गतवर्षीपासून त्यांची परिस्थिती हलाखीची झाली. अशा स्थितीत दीडहजार रुपये किती दिवस पुरणार? या रक्कमेत वाढ करण्याची गरज आहे.
-राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना, चंद्रपूर
सरकारने दीडहजार रुपये देण्याचे जाहीर केले. ही रक्कम तातडीने दिली पाहिजे. व्यवसाय चालत नसल्याने कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा काळात मदत देण्याचा निर्णय चांगला आहे.
-प्रशांत गेडाम, रिक्षाचालक, बाबूपेठ चंद्रपूर
केवळ परवानाधारकांनाच मदत मिळणार आहे. त्यामुळे अनेक रिक्षाचालक मदतीपासून वंचित राहतील. ज्यांनी परवाना मिळविण्यासाठी कागदपत्रे सादर केली. त्यांनाही ओसीच्या आधारे दीडहजाराची मदत दिली पाहिजे.
-सुधाकर रिंंगणे, रिक्षाचालक तुकूम चंद्रपूर