अनुदानाअभावी खासगी वसतिगृहे उपाशी

By Admin | Updated: August 11, 2015 01:37 IST2015-08-11T01:37:33+5:302015-08-11T01:37:33+5:30

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागद्वारा अनुदानित जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहांना सन

Private hostels are hungry due to subsidies | अनुदानाअभावी खासगी वसतिगृहे उपाशी

अनुदानाअभावी खासगी वसतिगृहे उपाशी

चंद्रपूर: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागद्वारा अनुदानित जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहांना सन २०१४-१५ या वर्षाचे अनुदान देण्यात न आल्याने या वसतीगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या तीन हजारावर विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू असून त्यांना अनेकदा उपासमारीचा सामना करावा लागत आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने चंद्रपूर जिल्ह्यातील ६८ मागासवर्गीय वसतीगृहांना अनुदान देण्यात येते. ही वसतीगृहे खासगी संस्था चालवितात. या सर्व वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तीन हजार इतकी आहे. मात्र मागील वर्षीपासून या वसतीगृहांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. गंभीर बाब म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील वसतीगृहांना नियमित अनुदान दिले जात आहे. (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यामागे मिळणारे अनुदान अल्प
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महिन्याकाठी केवळ ९०० रुपये अनुदान दिले जाते. महागाईच्या काळात हे अनुदान अतिशय अल्प आहे. या विद्यार्थ्यांच्या एका दिवसातील दोन वेळच्या जेवणाचा खर्च ३० रुपये येतो. एखादा विद्यार्थी आजारी पडला तर त्याच अनुदानातून उपचारासाठी खर्च करावा लागतो. या उलट शासकीय वसतीगृहातील प्रत्येक विद्यार्थ्यामागे तीन हजार रुपये अनुदान दिले जात आहे. शासनाकडून असा भेदभाव का, असा प्रश्न संस्था चालकांनी उपस्थित केला आहे.

कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन
वसतीगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिशय तुटपुंजे मानधन देण्यात येते. ते देखील वेळेवर मिळत नाही. वसतीगृह अधीक्षक, स्वयंपाकी, चौकीदार मदतनिस यांचे माहे मार्चपासूनचे मानधन अद्यापही थकीत आहे. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. मागील वर्षीसुद्धा जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने आठ महिन्यानंतर ऐन दिवाळीच्या दिवशी मानधन अदा केले होते.

उधारीसाठी दुकानदारांचे हात वर
जिल्ह्यातील मागासवर्गीय वसतीगृहांचे अनुदान थकीत असल्याने यावर्षीसाठी किराणा खरेदी, भाजीपाला, धान्य व इतर साहित्य कसे खरेदी करावे, असा प्रश्न संस्था चालकांना पडला आहे. कोणतेही दुकानदार वसतीगृह चालकांना उधारीवर साहित्य देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता वसतीगृह कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Private hostels are hungry due to subsidies