खासगी रुग्णालयांनी नवे पेशंट दाखल करणे थांबविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 05:00 IST2021-04-18T05:00:00+5:302021-04-18T05:00:37+5:30
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत रुग्णांची संख्या २९ हजार ५५४ पोहोचली. आठ हजार ९०४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. साडेचार लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर शहरातील काही वॉर्ड, वरोरा व भद्रावती कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. बाधितांच्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. आरटीपीसीआर व अॅन्टिजेन चाचण्यांची संख्या वाढल्याने दरदिवशी एकहजारपेक्षा जास्त व्यक्ती पॉझिटिव्ह आढळत आहेत.

खासगी रुग्णालयांनी नवे पेशंट दाखल करणे थांबविले!
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना उद्रेकाची स्थिती हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर आली आहे. बेड्सची व्यवस्था करण्यास जिल्हा प्रशासनाला पुन्हा काही दिवस लागण्याची शक्यता दिसत असतानाच चंद्रपुरातील काही खासगी रुग्णालयांनी बेड्सअभावी नवीन रुग्ण दाखल करणे थांबविले. त्यामुळे कोविड व नॉन कोविड शेकडो रुग्ण मरणाच्या दारात आहेत. उपचारासाठी आता कुठे न्यायचे, या प्रश्नाने कुटुंबीयांचाही प्राण कंठाशी आला आहे.
कोरोना संसर्ग होण्याचा वेग वाढतच असल्याने कोविड हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर व डेडिकेड कोविड सेंटरमधील खाटांची संख्या फुल्ल झाली. पॉझिटिव्हिटीचा रेट पाहता जिल्हा प्रशासनाला नवीन केंद्रांसाठी इमारती ताब्यात घेण्याची प्रक्रिया क्षणाचाही विलंब न करता पूर्ण करावी लागणार आहे.
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत रुग्णांची संख्या २९ हजार ५५४ पोहोचली. आठ हजार ९०४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. साडेचार लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर शहरातील काही वॉर्ड, वरोरा व भद्रावती कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. बाधितांच्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. आरटीपीसीआर व अॅन्टिजेन चाचण्यांची संख्या वाढल्याने दरदिवशी एकहजारपेक्षा जास्त व्यक्ती पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे चंद्रपुरातील खासगी कोविड रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल करून घेण्यास बेड्स शिल्लक नाहीत. त्यामुळे रूग्णांना आता शासकीय रूग्णालयाकडे उपचारासाठी धाव घ्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
केवळ ५८ बेड्स शिल्लक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, राजुरा वरोरा व उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, चंद्रपूर कोविड सेंटर मिळून २० खासगी रुग्णालयांत शुक्रवारपर्यंत ११५६ कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयांच्या बेड्सची क्षमता १२२३ आहे. आता केवळ ५८ बेड्स शिल्लक असून बहुतांश जनरल आहेत.
पॉझिटिव्हिटीच्या डबलिंग रेटने नागरिकांमध्ये धडकी
मार्चपासून वेग धरलेल्या पॉझिटिव्हिटीचा रेट खाली न येता पुन्हा वाढतच आहे. शुक्रवारी नोंदविलेल्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येनुसार डबलिंग रेट आता ३९. ३५ वर पोहोचला आहे. हा रेटही खाली येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. बेड्स शिल्लक नसल्याने खासगी डॉक्टर आता नवीन रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत असल्याची माहिती रुग्णांच्या कुटुंबीयांनी दिली.
कंत्राटी डॉक्टरांच्या सेवा घेण्याचे निर्देश
चंद्रपूर: शासकीय रुग्णालयात तत्परतेने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जेथे डॉक्टरांची संख्या कमी पडत असतील तेथे कंत्राटी तत्वावर डॉक्टर व इतर आरोग्य सेवकांच्या सेवा वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा घेतला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जनार्दन लोंढे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर सोनारकर, डॉ. श्रीकांत परांजपे, डॉ. श्रीकांत मसराम, डॉ. दीप्ती श्रीरामे उपस्थित होते.