लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनातर्फे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व राज्य शासनातर्फे महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनांची आणखी प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व गरजू रुग्णांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय पॅनलवर खासगी रुग्णालयांची संख्या वाढविणे आवश्यक आहे, यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशा सूचना आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिल्या. दरम्यान, पॅनलवर येणाऱ्या खासगी रुग्णालयांसाठी चांगले पॅकेज तयार करण्यात येत असून, निधी ३० दिवसांत संबंधित रुग्णालयाला वळता करण्यात येईल. आरोग्यासाठी शासन स्तरावरून निधीची कमतरता होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार आदी उपस्थित होते.
१ हजार ३५६ आजारांवर उपचारप्रधानमंत्री आयुष्मान भारत प्रधानमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत १ हजार ३५६ आजारांवर उपचार व शस्त्रक्रियांचा समावेश आहे. असे सांगून डॉ. शेटे म्हणाले, यात आणखी आजारांचा समावेश करण्यात येणार आहे. रुग्णांना स्थानिक स्तरावरच तत्काळ चांगली आरोग्यसेवा मिळावी, असा शासनाचा मानस आहे. त्यासाठीच जास्तीत जास्त खासगी रुग्णालयांना शासकीय पॅनलवर समाविष्ट करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पॅनलवरील रुग्णालये :जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एकूण २३ रुग्णालय अंगीकृत असून, यात १५ शासकीय रुग्णालय, तर आठ खासगी रुग्णालय आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय, चिमूर, मूल, राजुरा आणि वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच बल्लारपूर, भद्रावती, गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना, नागभीड, पोंभुर्णा, सावली, सिंदेवाही आणि ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे, तर खासगी रुग्णालयांमध्ये चंद्रपूर येथील कोल सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रिस्ट हॉस्पिटल, गाडेगोणे आर्थोपेडिक हॉस्पिटल, मानवटकर हॉस्पिटल, मुसळे हॉस्पिटल, वासाडे हॉस्पिटल, चिमूर येथील श्रीहरी नेत्रालय आणि ब्रह्मपुरी येथील यशलोक हॉस्पिटल या रुग्णालयांचा समावेश आहे.