प्रधानमंत्र्यांचा चलनबंदी निर्णय राष्ट्र विकासासाठी आवश्यक
By Admin | Updated: November 19, 2016 00:57 IST2016-11-19T00:57:01+5:302016-11-19T00:57:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० व १००० नोटा चलनातून बंद करून देशात निर्माण होणाऱ्या...

प्रधानमंत्र्यांचा चलनबंदी निर्णय राष्ट्र विकासासाठी आवश्यक
हंसराज अहीर यांचे आवाहन : अफवांवर विश्वास ठेवू नये
चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० व १००० नोटा चलनातून बंद करून देशात निर्माण होणाऱ्या काळ्या पैशावर घाळा घालण्याचे पाऊल उचलले आहे. यामुळे दहशतवादी व नक्षलवाद्यांसह अतिरेकी कारवाई संलग्न असणाऱ्यांना आता काळ्या पैशाविना मोठ्या प्रमाणात आडकाठी निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे भविष्यात अर्थव्यवस्थेला उभारी येण्यासोबत विकासासाठी मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. जनतेने विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून चलनबंदीच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यावा, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.
या संदर्भात बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले की, देशात चलनबंदीचा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध बँकात कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अतिरिक्त कार्य करून ग्राहकांना उचित सेवा उपलब्ध दिली. त्यामुळे केंद्र सरकारच्या चलनबंदीचा निर्णय राबविण्यात मदत झाली आहे. याआधी जनधन योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी असेच स्पृहनिय कार्य केले असल्याने पुढेही असेच पुढे येवून राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान यांच्या चलनबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा मोठ्या प्रमाणात नष्ट होणार असून याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे. जनतेने बँकेच्या माध्यमाने चलनबदलासाठी होत असलेला थोडा त्रास सहन केला तर पुढे भविष्यातील पिढीला विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी ध्येर्य राखत आपले व्यवहार करण्याचे आणि विरोधकांच्या अफवांवर विश्वास न ठेवता निर्णयाचे समर्थन करण्याचे आवाहन केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)