फळे,पालेभाज्यांचे भाव उतरले,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:19+5:302021-02-05T07:37:19+5:30
गृहिणी आनंदात : भाजी बाजारात गर्दी वाढली बल्लारपूर : भाजी बाजारात सर्वच भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे पालेभाज्यांचे भाव ...

फळे,पालेभाज्यांचे भाव उतरले,
गृहिणी आनंदात : भाजी बाजारात गर्दी वाढली
बल्लारपूर : भाजी बाजारात सर्वच भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे पालेभाज्यांचे भाव कमालीचे गडगडले. फळेही शंभरच्या आतच असल्यामुळे दिवसभर पालेभाज्या व फळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड पाहावयास मिळाली.
बल्लारपूर शहरातील भाजी मंडईमध्ये सर्व भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ज्या भाज्यांची किंमत १५ दिवसाअगोदर अव्वाच्यासव्वा होती, त्या भाज्या स्वस्त झाल्या होत्या. टमाटर १० रुपये किलो, कोबी १५ रुपये किलो, मिरची २० रुपये किलो, कोथिंबीर ५ रुपये जुडी, मेथी ५ रुपये, वाटाणा २० रुपये किलो, गाजर १० रुपये किलो, मिरची २० रुपये किलो या भावाने विकल्या जात होते. सायंकाळी तर जो भाव मिळेल त्याभावाने भाजी विकून भाजी विक्रेत्यांनी दुकाने खाली केली. यामुळे पालेभाज्या उत्पादकांना चांगलाच फटका बसला आहे.
फळांचे भाव
जी फळे मागील महिन्यात महाग होती, ती फळेही स्वस्त झाली आहेत. २०० रुपये किलो मिळणारे डाळिंब १६० रुपये किलो, पपई ३० रुपये किलो, केळी २० रुपये डझन, मोसंबी ६० रुपये किलो, चिकू ६० रुपये किलो, सफरचंद १४० रुपये किलो, अंगूर ८० रुपये किलो असे सध्या फळांचे भाव सुरू आहे.
कोट
यंदा पालेभाज्यांचे उत्पादन जास्त प्रमाणात असल्यामुळे गावखेड्यातील भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणात मंडईत पालेभाज्या आणत आहेत. पुढच्या महिन्यापर्यंत भाजीपाला स्वस्तच राहणार आहे.
- अमित पाझारे, भाजी विक्रेते,बल्लारपूर.
कोट
या आठवड्यात भाजीपाला स्वस्त मिळत असल्याने गृहिणींना सोयीस्कर झाले आहे. फक्त याच महिन्यात पालेभाज्यांचा स्वाद घेणे आरोग्यासाठी उत्तम आहे.
- सत्यभामा भाले, गृहिणी, बल्लारपूर
कोट
सध्या बाजारात फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पपई, केळी, अंगूर, चिकू, सफरचंद, संत्री घेण्यासाठी सामान्य जनतेची गर्दी वाढली आहे. पुढच्या महिन्यात मात्र किमती वाढण्याची शक्यता आहे.
- बाबाखान, फळ विक्रेता, बल्लारपूर.