जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST2021-02-05T07:40:03+5:302021-02-05T07:40:03+5:30
धोकादायक पुलाला कठडे लावा चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षक कठडे नसल्याने ...

जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला
धोकादायक पुलाला कठडे लावा
चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षक कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नाल्यांवर संरक्षक कठडे तुटले असून काही चोरीलाही गेले आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने याकडे लक्ष देवून नव्याने कठडे बांधावे, अशी मागणी होत आहे.
अवैध वाहतुकीला निर्बंध घालावा
चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक मार्गांवर अवैध वाहतुकीला ऊत आला असून, याकडे मात्र परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना सतत घडत असून, यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. याकडे वाहतूक विभाग, तसेच परिवहन विभागाने लक्ष ठेवून अवैध वाहतुकीवर निर्बंध आणण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, जिवती, ब्रह्मपुरी, चिमूर, सावली या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. यामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे.
मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी
पोंभुर्णा: खातेनिहाय शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे सक्त आदेश असले तरी शिक्षकासह अनेक कर्मचारी मुख्यालयाबाहेर राहत असल्यामुळे विद्यार्थी व शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. मात्र, मुख्यालयी राहत असल्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व गावप्रमुखांशी सलगी साधून प्रोत्साहन भत्याची उचल करीत आहेत.
शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयांत अस्वच्छता आहे. विशेषत: प्रशासकीय भवन परिसर सोडला तर इतर कार्यालयात अस्वच्छता बघायला मिळते. भिंतीवर व पायऱ्यावर तंबाखू व गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसून येते. या प्रक्रियेत जनतेसोबतच कार्यालयीन कर्मचाऱ्यांही सहभाग असतो. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
फूटपाथवरील अतिक्रमण हटवा
चंद्रपूर : तुकूम रोडवरील बियानी पेट्रोलपंप ते एसटी वर्कशॉपपर्यंत मुख्य रस्त्यावर बऱ्याच दिवसांपासून मटन मार्केटचा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे हा रहदारीचा परिसर दुर्गर्धी व घाणीने वेढलेला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. सदर मटन मार्केट इतरत्र हलविण्याबाबत नागरिकांनी निवेदन दिले, मात्र कारवाई झाली नाही. या प्रश्नांकडे मनपाचे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
बंगाली कॅम्प बाजारात घाणीचे साम्राज्य
चंद्रपूर: शहरालगतच्या पडोली तसेच बंगाली कॅम्प परिसरातील बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या बाजारात खरेदी करण्यासाठी परिसरातील अनेक लोक मोठ्या प्रमाणावर येतात.
वन्यप्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त
चिमूर : रानडुकरांच्या हैदोसाने वन परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. रानडुकरांचा कळप शेतात घुसून पिकांची नासधूस करीत आहेत. शेतकरी वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी जागल करतात. मात्र, कळपाने येणाऱ्या वन्यप्राण्यांना हुसकावणे कठीण होत आहे.
रात्री उशिरापर्यंत चालतो व्यवसाय
चंद्रपूर : शहरातील तुकूम, रामनगर परिसरात काही व्यावसायिक रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू ठेवत असल्याने सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. छोट्या व्यावसायिकांनी दुकान बंद करण्यासाठी थोडा उशिर केला तरी दंड आकारला जातो. मात्र, मोठ्या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न विचारला जात आहे.
ट्रॅव्हल्समुळे अपघाताची शक्यता
चंद्रपूर : शहरातील काही ट्रॅव्हल्सधारक रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्स उभ्या ठेवतात. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. काही मंगल कार्यालय परिसरात असलेल्या अरुंद रस्त्यावरही ट्रॅव्हल्स उभ्या ठेवल्या जात आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
प्रसाधनगृह नसल्याने महिलांची कुचंबना
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही प्रवासी निवाऱ्याजवळ प्रसाधनगृह नसल्याने तसेच ज्या ठिकाणी आहे, तिथे सर्वत्र अस्वच्छता असल्याने महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली आहे.
पदोन्नतीपासून पात्र कर्मचारी वंचित
चंद्रपूर : जिल्ह्यात सात विभागामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. तर दुसरीकडे कामगारांची शैक्षणिक पात्रता असूनही त्यांना पदोन्नती देण्यात आली नाही. त्यामुळे पदोन्नतीचा प्रश्न आहे. ही समस्या सोडविण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे.
स्वच्छता मोहीम करण्याची मागणी
गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम सुरू आहे. मात्र, काही उपद्रवी नागरिकांमुळे तालुक्यात योजनेचा बोजवारा उडताना दिसून येत आहे. त्यामुळे स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मोकाट जनावरांचा चौकाचौकांत ठिय्या
वरोरा : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. ही जनावरे रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांचा अपघात होण्याचा धोका आहे. मोकाट जनावरांचा नगर परिषदेने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.
मूल-पोंभूर्णा बस सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : मूल-पोंभूर्णा-गोंडपिपरी ही प्रवासी बससेवा दुपारी ४ ते ५ या वेळेत सुरू करण्याची मागणी केली जात आहे. दोन्ही तालुक्यांतील नागरिकांना महत्त्वाच्या कामासाठी या ठिकाणचा नेहमी संबंध येतो. याकडे महामंडळाने लक्ष द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.
डोंगरगाव रस्त्याची दुरवस्था
वरोरा : वरोरा मार्गावरील डोंगरगाव, दहेगाव ते निमसडा पाटीपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्या रस्त्यावर मोठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्या रस्त्यावर पडलेले खड्डे न बुजविल्यामुळे वाहनचालकांचा वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी चिकणी, बोपापूर, डोंगरगाव, दहेगाव, मोहबाळा येथील नागरिकांनी केली आहे.