The price of the crop in the market committee is priceless | बाजार समितीतच पिकाला कवडीमोल भाव
बाजार समितीतच पिकाला कवडीमोल भाव

ठळक मुद्देओले असल्याचे कारण : ३७१० रुपये हमीभाव, खरेदी दोन हजारात

प्रकाश काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला खासगी व्यापाऱ्यांकडून दोन हजार रुपयांपर्यंत कमी दर देत असल्याने शेतकऱ्यांची डोळ्यादेखत फसवणूक करण्यात येत आहे. मात्र याकडे सरकारी यंत्रणेचे नियंत्रण नसल्याने शेतकºयांना मोठया प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
राजुरा तालुक्यात यावर्षी चार हजार ५५२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. सोयाबीन कमी कालावधीचे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढविला. लवकर सोयाबीन निघून यावर्षी दिवाळी सण आनंदात जाईल, असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. कापणी करून ठेवलेला सोयाबीन कडपा पावसात भिजल्याने सोयाबीनच्या शेंगा अंकुरल्या आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन ओले असल्याच्या नावावर खासगी व्यापारी शेतकऱ्यांची अक्षरश: लूट करीत आहे. कवडीमोल भावात खासगी व्यापारी सोयाबीनची खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
सोयाबीनला ३ हजार ७१० रुपये हमीभाव असताना सोयाबीन ओले असल्याच्या नावाखाली खासगी व्यापारी सोयाबीनला ३ हजार ५०० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंत कमी दर देत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. एवढया मोठया प्रमाणात शेतकऱ्यांची खासगी व्यापारी लूट करीत असल्याने सरकारी यंत्रणा मात्र गप्प आहे. शेतकºयांचे कैवारी समजले जाणारे राजकीय पुढारी शेतकºयांच्या समस्या जाणून घ्यायला अजिबात तयार नाही. परतीच्या पावसाने शेतकºयांचे कंबरडे मोडले असताना पुन्हा सुल्तानी संकट शेतकºयांची पाठ सोडायला तयार नाही. शेतकऱ्यांचा कोणी वालीच उरला नसल्याने शेतकरी नाईलाजाने सोयाबीनची विक्री करीत आहे. यात व्यापाºयांचे फावत आहे.

नाफेडची सोयाबीन खरेदी बंदच
राजुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी नाफेडची खरेदी करण्यात येते. मात्र दिवाळी होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी नाफेडची शासकीय खरेदी अद्यापही सुरू करण्यात आली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीत खासगी व्यापारी सोयाबीनचा लिलाव दुपारनंतर करीत असल्याने शेतकºयांना नाईलाजाने रात्रीपर्यंत ताटकळत राहावे लागत आहे.

Web Title: The price of the crop in the market committee is priceless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.