चंद्रपूर : ग्राहकापर्यंत पोहचणाऱ्या विविध उत्पादनाच्या किमतीमध्ये होणारी वाढ व घट ठरविण्यासाठी ग्राहक किमती निर्देशांक काढण्यात येत असून केंद्र व राज्य स्तरावरील निर्देशांक ठरवण्याचे काम प्रथमच जिल्हास्तरावर होत आहे. ग्राहक किमती निर्देशांक ठरविण्यासाठी भावसंकलकांनी सतर्क राहून काम करावे, असे आवाहन अर्थ व सांख्यिकी प्रादेशिक सहसंचालक कृष्णा फिरके यांनी केले आहे.
लेखा कोषागार भवन, चंद्रपूरच्या सभागृहात ग्राहक किमती निर्देशांक काढण्यासंदर्भात विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास समिती) सुनील धोंगडे उपस्थित होते.
कार्यशाळेचे उदघाटन प्रादेशिक सहसंचालक कृष्णा फिरके यांच्या हस्ते संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन प्रशिक्षणाला सुरुवात झाली. चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत ग्राहक किंमती निर्देशांक ठरविण्यासाठी ११ भावसंकालकांनी शास्त्रोक्त पध्दतीने ठरवून दिलेल्या विविध वस्तुंचे किरकोळ बाजारातील दर अचूक संकलन करण्यात यावे, यासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. याबाबतची कार्यपध्दती, भावसंकलन केंद्राची निवड, बाजारपेठेची निवड, वस्तुसूची, वस्तूचे विस्तृत वर्णन, मुख्य राखीव दुकानांची निश्चिती, वस्तु आणि सेवांच्या किमती संकलन करणे, याचे दैनंदिन जीवनातील महत्व याबाबत फिरके यांनी माहिती दिली. जिल्हास्तरीय ग्राहक किंमती निर्देशांकावर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ग्राहक किंमती निर्देशांक काढण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित पध्दत विकसित केली आहे. त्यानुसार भावसंकलकांनी जिल्ह्यातील विविध आस्थापना व कुटुंबांची माहिती संकलित करावयाची आहे. माहितीचे संकलन करताना घ्यावयाची काळजी तसेच पध्दती याबाबत कृष्णा फिरके यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
यावेळी जिल्हा सांख्यिकी अधिकारी अमित सुतार, रमेश पेरगु, नियोजन अधिकारी सुनील धोंगडे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन रामटेके आभार पी. आर. पोरेड्डीवार यांनी मानले. कार्यशाळेला प्रादेशिक कार्यालय नागपूर येथील संशोधन सहायक भुसारी व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.