राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यावर दारूबंदी विरोधकांचा दबाव

By Admin | Updated: May 14, 2016 00:38 IST2016-05-14T00:38:23+5:302016-05-14T00:38:23+5:30

विदेशी पर्यटकांना पर्यटनासाठी जिल्ह्यात घेऊन आलेल्या डेक्कन ओडीसी या पंचतारांकित रेल्वेत मद्य असल्याच्या तक्रारीनंतर....

The pressure of the opposition to the State Excise Duty | राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यावर दारूबंदी विरोधकांचा दबाव

राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यावर दारूबंदी विरोधकांचा दबाव

चंद्रपूर : विदेशी पर्यटकांना पर्यटनासाठी जिल्ह्यात घेऊन आलेल्या डेक्कन ओडीसी या पंचतारांकित रेल्वेत मद्य असल्याच्या तक्रारीनंतर तपासणी करून मद्य नसल्याचा निर्वाळा देणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला शुक्रवारी दिवसभर दारूबंदी विरोधकांच्या दबावाला सामोरे जावे लागले. त्यामुळे कधी हो तर कधी नाही असे म्हणत वेळ मारून नेण्याची पाळी या अधिकाऱ्यावर आली. मात्र त्याच्या या मानसिकतेचा हवा तसा लाभ घेण्याचा प्रयत्न दारूबंदी विरोधकांनी करण्याचा प्रयत्न केला.
बुधवारी ११ मे रोजी पहाटे साडेतीन वाजता डेक्कन ओडीसी पंचतारांकित रेल्वे चंद्रपूरला आली होती. या रेल्वेमध्ये मद्य आणि बिअर बार असून त्याचा वापर होत असल्याचा आरोप करीत शहरातील दारूबंदी विरोधकांच्या पुढाऱ्यांनी काही समर्थकांसह रेल्वे स्टेशनवर धाव घेतली होती. या पंचतारांकित रेल्वेतून मद्य चंद्रपुरात आल्याने दारूबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारीही पोलिसात झाल्या होत्या. जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी यापैकी कुणीही अधिकारी शहरात नसल्याने तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्यावरून बराच गोंधळ उडाला होता.
अखेर फोनाफोनी करून पोलिसात झालेली तक्रार रेल्वे पोलिसांकडे हस्तांतरित झाल्यावर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिल्यावर तपासाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक संजय आक्केवार आणि त्यांच्या चमूने डेक्कन ओडीसीच्या रेकॉर्डची तपासणी केली. या तपासणीमध्ये मद्य अथवा आक्षेपार्ह असे काहीच आढळले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर ही रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली होती.
या संबंधातील वृत्त शुक्रवारी वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्यावर मात्र अनेकांनी संबंधित अधिकाऱ्याला मोबाईलवरून फोन करून भंडावून सोडले. यामुळे वेळ मारून नेण्यासाठी कधी हो तर कधी नाही असे सांगत सुटका करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांच्या संभाषणाचे रेकॉर्डिग करून या प्रकरणाचा हवा तसा लाभ घेण्याचा प्रकार घडला.
या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक संजय अक्केवार यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, ते म्हणाले, केलेल्या तपासणीचा आणि कारवाईचा कोणताही अहवाल वरीष्ठांना देण्याची पद्धत असतेच. त्यानुसार आपण आपल्या वरीष्ठांना तोंडी अहवाल कळविला. वरीष्ठांना अहवाल कळविल्याचे वृत्तपत्रातही प्रकाशित झाले. मात्र नेमके या अहवालावरून आपणास दिवसभर बऱ्याच जणांनी फोन करून विचारणा केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, डेक्कन ओडीसी चंद्रपुरात येऊन परतीच्या प्रवासाला निघाली असली तरी दारूबंदी विरोधकांना मात्र नवा विषय देऊन गेल्याची प्रतिक्रिया शहरात उमटत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

दारू होती तरीही दिशाभूल - दीपक जयस्वाल
डेक्कन ओडीसी या रेल्वेमध्ये दारू होती, तरीही ती नसल्याची दिशाभूल अधिकाऱ्यांकडून केली जात आहे, असा आरोप दीपक जयस्वाल यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, रेल्वेतून आलेली दारू प्रशासन समजून घेणार नसेल तर उद्या कुणीही ४० चाकाच्या गाडीतून दारू आणली तर प्रशासन कारवाई करणार नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी प्रशासनाने चौकशी करावी, अन्यथा चुकीचा संदेश जाईल, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: The pressure of the opposition to the State Excise Duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.