राज्यस्तरीय चर्चासत्रात मिशन नवचेतनाचे सादरीकरण
By Admin | Updated: December 24, 2015 01:16 IST2015-12-24T01:12:40+5:302015-12-24T01:16:51+5:30
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग व महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या चर्चासत्रात ...

राज्यस्तरीय चर्चासत्रात मिशन नवचेतनाचे सादरीकरण
उपक्रम प्रेरणादायी : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रतिपादन
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग व महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या चर्चासत्रात मिशन नवचेतनाचे सादरीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले. यावेळी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, प्रदेश जिल्हा परिषद केंद्र प्रमुख संघाचे राज्याध्यक्ष अर्जून साळवे यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात मिशन नवचेतना सुरू करण्याकरीता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णयाचे अवलोकन केले. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा प्रगत करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे उद्दिष्टे साध्य करणे, जिल्हा परिषदेच्या शाळेत ज्ञानरचनावादाची व एक्टीव्हीटी बेस लर्निंग अध्यापन पद्धतीची अंमलबजावणी करणे, ग्रामीण भागातील गुणवत्ता कार्यक्रम अंतर्गत श्रेणी सुधार कार्यक्रमाची अंमलबजावणीे करणे, शिक्षकांना प्रेरणा देवून त्यांच्याशी संवाद साधने, ही उद्दीष्टे निश्चित केली आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरीता जिल्हास्तरावर थिंक टँक तज्ज्ञ शिक्षकांचा गट तयार करण्यात आलेला आहे, असे त्यांनी सांगितले.
तालुकास्तरावर भाषा, गणित, इंग्रजी ब्रिगेड स्थापन करण्यात आलेली आहे. या ब्रिगेड सदस्यांना दर महिन्याला जिल्हास्तरावर साधन व्यक्ती यांच्या मार्फतीने प्रशिक्षण दिले जाते. जिल्ह्यात एकूण १४० केंद्र आहेत यात नगर परिषदेचे सहा, जिल्हा परिषदेचे १३३ केंद्र आहेत. ब्रिगेडच्या सहकार्याने या १३३ केंद्रात दर महिन्याला केंद्र संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षात एकूण ८ केंद्र सम्मेलन आयोजन करण्यात येणार आहे. या मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १३३ शाळेची मॉडेल केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. मिशन नवचेतना कार्यक्रमासाठी जिल्हा वार्षिक नियोजनातून ४५.०० लक्ष रुपये मंजूर झाले असून १३३ शाळा जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे, असे त्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)