चांदा ते बांदा योजनेसाठी आराखडे सादर करा
By Admin | Updated: August 17, 2016 00:34 IST2016-08-17T00:34:48+5:302016-08-17T00:34:48+5:30
विविध संसाधनाचा नियोजनबध्द वापर करण्यासोबतच रोजगाराच्या संधी तसेच जिल्हयाचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी चांदा ते बांधा ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.

चांदा ते बांदा योजनेसाठी आराखडे सादर करा
दीपक केसरकर : विविध योजनेअंतर्गत रोजगार निर्मितीवर भर
चंद्रपूर : विविध संसाधनाचा नियोजनबध्द वापर करण्यासोबतच रोजगाराच्या संधी तसेच जिल्हयाचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी चांदा ते बांधा ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विविध विभागाने आपले नाविण्यपूर्ण आराखडे तातडीने सादर करावे, असे निर्देश वित्त व नियोजन तसेच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात चांदा ते बांदा योजने संदर्भात आयोजित बैठकीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच आमदार बाळु धानोरकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, मनपा आयुक्त संजय काकडे, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, अप्पर पोलीस अधिक्षक राजपुत, बाधंकामाचे अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग व चंद्रपूर जिल्हयामध्ये रिसोर्स बेस्ड डेव्हलमेंटसाठी सदर चांदा ते बांधा ही योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत कृषी व संबंधित क्षेत्र, पर्यटन, पशु, दूग्ध व मत्स्यव्यवसाय, उद्योग व खनिज विकास, जलसंपदा व वने, ग्रामीण विकास व गरिबी निर्मूलन या सहा बाबींकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. विविध संसाधनाचा नियोजनबध्द वापर करुन दरडोई उत्पन्न दुप्पट करणे तसेच विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे केसरकर म्हणाले.
या योजनेअंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. जिल्हयातील पर्यटनास चालना देण्यासोबतच शेतकऱ्यांना दिलासा देणारे छोटे मोठे उद्योग, क्लस्टर प्रस्तावित केले जावे. पशु, दुग्ध आणि मत्स्यव्यसायाला चालना देण्यासोबतच फलोत्पादन, बांबूवर आधारित वस्तु निर्मिती, धानापासून पोहे, चुरमुरे बनविण्याचे उद्योग आदी विविध उपक्रमांचा समावेश करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पर्यटनासाठी व्हिलेज टुुरीझम सुरु करण्यासारखे उपक्रम प्राधान्याने घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याबाबत येत्या १५ दिवसात पुन्हा स्वतंत्र बैठक घेतली जाईल. यावेळी विभागाने आपले परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे, असे केसरकर यांनी सांगितले.
विविध प्रकारचे क्लस्टर तयार करताना तालुकानिहाय करण्याची सूचना यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. प्रत्येक तालुक्यात रोजगार निर्मितीचा वेगळा उपक्रम घेण्याबाबतही त्यांनी सूचविले. चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव पर्यटन विकास महामंडळ व महानगरपालिकेच्या वतीने विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. (शहर प्रतिनिधी)