दहीहंडी फोडण्यासाठी तरुणाई झाली सज्ज

By Admin | Updated: September 6, 2015 00:52 IST2015-09-06T00:52:09+5:302015-09-06T00:52:09+5:30

श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हटले की तरुणाईला आकर्षण असते, यानिमित्त भरविण्यात येत असलेल्या दहीहांडी स्पर्धेचे. मात्र अलिकडच्या काळात अशा स्पर्धांचे आयोजन कमी होत असल्याचे दिसून येते.

Prepare for the sharpening of the Dahi Handi | दहीहंडी फोडण्यासाठी तरुणाई झाली सज्ज

दहीहंडी फोडण्यासाठी तरुणाई झाली सज्ज

श्रीकृष्ण जन्मोत्सव : गावागावांतून येतात नागरिक
चंद्रपूर : श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हटले की तरुणाईला आकर्षण असते, यानिमित्त भरविण्यात येत असलेल्या दहीहांडी स्पर्धेचे. मात्र अलिकडच्या काळात अशा स्पर्धांचे आयोजन कमी होत असल्याचे दिसून येते. असे असले तरी काही नवयुवक मंडळांनी ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. चंद्रपुरात पठाणपुरा परिसरात व तुकूम येथे दहीहांडी स्पर्धेचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आयोजक मंडळांनी जय्यत तयारीदेखील केली आहे.
पठाणपुरा व्यायामशाळेजवळ उद्या रविवारी सायंकाळी ७ वाजता बजरंग दलाच्या वतीने ही दहीहांडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दहा वर्षांपासून बजरंग दल या ठिकाणी ही स्पर्धा घेत आहे. दरवर्षी या स्पर्धेचे आव्हान दहाहून अधिक चमू स्वीकारतात. यात प्रामुख्याने विठ्ठल मंदिर व्यायामशाळा, जगदगुरु व्यायामशाळा, पठाणपुरा व्यायामशाळा, घाटापुरा व्यायामशाळा, श्रीराम बालक आखाडा, बल्लारपूर, एकविरा व्यायामशाळा, नांदगाव पोडे व्यायामशाळा, काळाराम मंदिर व्यायामशाळा आदींचा समावेश असतो. २० ते २२ फूट उंच दहीहांडी बांधली जाते. एकावर एक बैठक घेऊन व्यायामशाळेतील युवक ही हांडी फोडतात. प्रारंभी उंचावर बांधलेली हांडी कोणतीही चमू फोडण्यात यशस्वी होत नसेल तर हांडी काही फूट खाली उतरविली जाते. यावर्षी दहीहांडी फोडणाऱ्या मंडळास केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडून २१ हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
दहीहांडी स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष अंकूश चौधरी, सहसंयोजक कमलेश मडावी, अ‍ॅड. सागर मंचलवार, अंकूश दारवेकर, धीरज भट्ट, विद्यानंद दहाट आदी कार्यकर्ते या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करीत आहेत. यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. याशिवाय अग्निशमन विभागाचे पथक, रुग्णवाहिकांही स्पर्धा ठिकाणी उपलब्ध असणार आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी चंद्रपूरसह तालुक्यातील हजारो नागरिक पठाणपुरा परिसरात येतात.
गोकूल गल्लीतील परंपरा अटीमुळे खंडित
गोकूल गली-सुदामा गली जन्माष्टमी मंडळाच्या वतीने चंद्रपुरात पहिल्यांदा येथील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर दहीहांडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर या मंडळाने सातत्याने ३४ वर्ष ही परंपरा कायम ठेवली. बहुदा यामुळे नगरपालिकेने या रस्त्याला गोकूल गली हे नाव दिले असावे. मात्र मागील वर्षी पोलीस विभागाने या मंडळाला परवानगी देताना ‘अनुचित घटना घडली तर जबाबदारी मंडळाने स्वीकारावी’ असे लिहून मागितले. मंडळाने तसे करण्यास नकार दर्शविला. त्यामुळे मंडळाची ही परंपरा मागील वर्षीपासून खंडित झाली. दहीहांडी स्पर्धा असताना लक्ष्मीनारायण मंदिर परिसर नागरिकांनी फुलून यायचा, हे विशेष.

Web Title: Prepare for the sharpening of the Dahi Handi