बनावट मस्टर तयार करुन रकमेची उचल
By Admin | Updated: April 26, 2017 00:44 IST2017-04-26T00:44:43+5:302017-04-26T00:44:43+5:30
गावातील गुराखी व इतर नागरिकांचे म.ग्रा.रो. हमीच्या कामावर गेल्याचे खोटे व बनावट मस्टर तयार करुन सावली तालुक्यातील हिरापूर येथील ...

बनावट मस्टर तयार करुन रकमेची उचल
हिरापूर येथील रोजगार सेवकाचा प्रताप : गुन्हा दाखल करण्याची मागणी
चंद्रपूर : गावातील गुराखी व इतर नागरिकांचे म.ग्रा.रो. हमीच्या कामावर गेल्याचे खोटे व बनावट मस्टर तयार करुन सावली तालुक्यातील हिरापूर येथील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असलेल्या रोजगार सेवक प्रभाकर गेडेकर याने परस्पर रक्कमेची उचल केली. ही बाब चौकशीअंती स्पष्ट झाली. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या रोजगार सेवकांकडून रक्कम वसूल करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अतूल कोडापे, अनिल बोहकावार यांनी मंगळवारी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
सावली तालुक्यातील हिरापूर ग्रामपंचायततंर्गत सन २०१० ते २०१५ या कालावधीत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतंर्गत रस्ता दुतर्फा व वृक्ष लागवड आदी कामे करण्यात आली. या कामात रोजगारसेवकाने गावातील गुराख्यासह अनेकजण कामावर न जातासुद्धा त्याच्या नावे खोटे मस्टर व कागदपत्रे बनवून पैशाची उचल केली. व भ्रष्टाचार केला. त्यामुळे रोजगारसेवकाला पदावरुन काढण्याची व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे निवेदन गावकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, यांना दिले होते.
त्यानुसार सावली पंचायत समितीच्यामार्फत चौकशी करण्यात आली. त्यावेळी रोजगार सेवक दोषी आढळून आला. त्यानंतर पंचायत समितीच्या फेरतपासणीच्या अहवालात रोजगार सेवकांकडून ६५ हजार ३८२ रुपये वसूल करण्याचे नमूद करण्यात आले.व अहवालाची प्रत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी पाठवली. मात्र अजुनही जिल्हा परिषदेकडून कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे भ्रष्टाचार करणार रोजगार सेवक मोकाट आहे.
रोजगार सेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अतूल कोडापे, अनिल बोहकावार यांनी मंगळवारी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली. (नगर प्रतिनिधी)