शहराचा कायापालट करणारा आराखडा तयार करा

By Admin | Updated: November 15, 2014 01:29 IST2014-11-15T01:29:43+5:302014-11-15T01:29:43+5:30

राज्याचे अर्थ व नियोजन मंत्र्यांनी आपला कार्यभार सांभाळताना प्रारंभीच शहरांच्या विकासाकडे बारकाईने लक्ष देणे सुरू केले आहे.

Prepare a changing city | शहराचा कायापालट करणारा आराखडा तयार करा

शहराचा कायापालट करणारा आराखडा तयार करा

चंद्रपूर : राज्याचे अर्थ व नियोजन मंत्र्यांनी आपला कार्यभार सांभाळताना प्रारंभीच शहरांच्या विकासाकडे बारकाईने लक्ष देणे सुरू केले आहे. याची सुरुवात त्यांनी चंद्रपूर महानगरपालिकेमधून केली. शहरात रस्ते, पिण्याचे पाणी, पार्र्कींग व्यवस्था, चौकांचे सौंदर्यीकरण, मलनिस्सारण व्यवस्था या समस्या ज्वलंत असल्याने यांचा अंतर्भाव असलेला शहराचा विकास आराखडा तातडीने तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देऊन चंद्रपूर शहराचा कायापालट करण्याचे सुतोवाच ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रपुरातील आपल्या दुसऱ्या दौऱ्यातच महानगरपालिकेला भेट देत आढावा बैठक घेतली. यावेळी महापौर राखी कंचर्लावार, आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, उपमहापौर वसंत देशमुख व स्थायी समितीचे अध्यक्ष रामु तिवारी यावेळी उपस्थित होते. बैठकीपूर्वी ना. सुधीर मुनगंटीवार यांचा मनपातर्फे नागरी सत्कार करण्यात आला.
महानगरपालिकेने राज्य व केंद्राचा निधी मोठ्या प्रमाणावर वापरून शहराचा विकास करावा. ज्या योजनांसाठी केंद्राचा निधी प्राप्त होतो. अशा योजनेवर राज्याचा निधी वापरू नये, अशा सूचना अर्थमंत्र्यांनी दिल्या. शहराचा आराखडा तयार करताना रस्ते, बगीचे, प्रशस्त सभागृह पार्कींग, पिण्याचे पाणी, झोपडपट्टी विकास, खेळाचे मैदान, चौकाचे सौंदर्यीकरण अशा विविध बाबींचा भविष्यातील नियोजनचा अंतर्भाव त्यात असावा, असे त्यांनी सूचित केले.
महानगरपालिकेने शहर विकासाचे प्रस्ताव शासनाला पाठविल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी नोडल आॅफिसर नियुक्त करावा अशा सूचना त्यांनी दिल्या. इरई व झरपट नदी विकास करणे आवश्यक असल्याचे सांगून संरक्षण भिंत बांधण्यासाठीच प्रस्ताव तातडीने तयार करा, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. झरपट नदी पात्रातील घराचे पुनर्वसन करण्यासाठी नगरसेवकांना विश्वासात घेऊन तेथील नागरिकांचे मत जाणून घ्यावे असे त्यांनी सूचविले. शहरातील कचरा उचलण्यासाठी घंटा गाडी घेण्याचा मनपाचा मानस योग्य असल्याचे सांगून यासाठी कालबाह्य साहित्य घेऊ नका, असे निर्देश त्यांनी दिले.
यासाठी इतर विकसित महानगरपालिकेने कुठले आधुनिक साहित्य वापरले का, याचा अभ्यास करावा, त्यानंतरच साहित्य खरेदी करावे. शहरातील मोक्षधाम विकसित होणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने प्रयत्न करावा, अशा सूचनाही ना. मुनगंटीवार यांनी केल्या. दरम्यान, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या विकास कामांची माहिती बैठकीत दिली. महापौर राखी कंचर्लावार यांनी विकासासाठी निधी द्यावा, अशी अर्थमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीत नगरसेवकांनी आपल्या समस्या मांडल्या. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Prepare a changing city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.