गरोदर मातांचा होतोयं छळ !

By Admin | Updated: May 10, 2014 00:06 IST2014-05-10T00:06:11+5:302014-05-10T00:06:11+5:30

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गरोदर मातांना मार्गदर्शन आणि प्रेमाचा सल्ला तर दूरच उलट उद्धट वागणूक देत ...

Pregnant mothers suffer from torture! | गरोदर मातांचा होतोयं छळ !

गरोदर मातांचा होतोयं छळ !

 चंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गरोदर मातांना मार्गदर्शन आणि प्रेमाचा सल्ला तर दूरच उलट उद्धट वागणूक देत उपचाराच्या नावाखाली छळच अधिक केला जात असल्याची माहिती आहे. बुधवारी सायंकाळी ४ वाजता भरती केलेल्या महिलेवर गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत कोणतेच उपचार करण्यात आले नाही. त्यामुळे भरती कशासाठी करण्यात आले, असा प्रश्न सदर महिला आणि तिच्या नातेवाईकांना पडला. डॉक्टरांची रिक्त पदे आणि अस्वच्छतेचा सामना करीत असलेले रुग्णालय अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. महिला वैद्यकीय अधिकार्‍यांचीही येथे रिक्त पदे आहेत. त्यामुळे महिला रुग्णांचा प्रश्न भेडसावत आहे. जिल्ह्यातील एकमेव मोठे रुग्णालय असल्याने जिल्हाभरातून रुग्ण येथे येतात. जिल्हा सामान्य रुग्णालयातच एका बाजूला स्त्री रुग्णालय आहे. सुरक्षित प्रसूतीसाठी अनेक महिला जिल्हा रुग्णालयात येतात. मात्र, येथे आल्यानंतर उपचाराच्या नावाखाली त्यांना केवळ वेदनाच सहन कराव्या लागतात. शिवाय एखाद्या गरोदर मातेकडून कक्षात उपस्थित परिचारिकांना माहिती विचारल्यास कधीच चांगले मार्गदर्शन किंवा प्रेमाचा सल्ला मिळत नाही. उलट उद्धट वागणूक आणि छळच अधिक केला जातो. मात्र उपचारासाठी अनेक महिलांसमोर ‘तोंड दाबून बुक्यांचा मार’ सहन केल्याशिवाय पर्याय राहत नाही, अशी स्थिती आहे. बुधवारी सायंकाळी ४ वाजता एका गरोदर महिलेला येथे भरती करण्यात आले. रक्त कमी असल्याने रक्त लावण्यात येणार असल्याचे सांगितले. परिचारिकेने तपासणीसाठी रक्तसुद्धा घेतले. मात्र दुसर्‍या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत रक्त तपासणीबाबत कोणताही अहवाल सदर महिलेला किंवा तिच्या नातेवाईकांना देण्यात आला नाही. विशेष म्हणजे, बेडवर झोपवून ठेवण्याव्यतिरिक्त कोणताही उपचार या १२ तासांच्या वेळात करण्यात आला नाही. त्यामुळे अन्य महिला रुग्णांच्या बाबतीत काय घडत असेल, हे सांगायलाच नको. विशेष म्हणजे, येथे महिला रुग्णांच्या गैरसोयीचे अनेक प्रकार यापूर्वीही चर्चेत आले होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Pregnant mothers suffer from torture!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.