लसीकरणांकडे गर्भवतींची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST2021-07-22T04:18:24+5:302021-07-22T04:18:24+5:30
कोरोनावर अद्यापही औषध निघाले नाही. कोरोना प्रतिबंधक म्हणून केवळ लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम ...

लसीकरणांकडे गर्भवतींची पाठ
कोरोनावर अद्यापही औषध निघाले नाही. कोरोना प्रतिबंधक म्हणून केवळ लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. सुरुवातीला केवळ हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर त्यानंतर सहव्याधी असणाऱ्यांना ही लस देण्यात येत होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वांना लसीकरण सुरु करण्यात आले; परंतु गर्भवती महिला व स्तनदा मातांना लसीकरणातून वगळण्यात आले होते; परंतु त्यांनासुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने कोरोना लसीकरणाविषयीच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने शिफारस केली होती. त्यानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाचा निर्णय घेतला. त्यामुळे जुलै महिन्यांपासून गर्भवती महिलांना लस देण्यात येत आहे; परंतु लसीकरणाबाबत असलेल्या गैरसमजामुळे गर्भवती महिला व स्तनदा मातांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.
कोट
न घाबरता लस घ्या
कोरोना लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. कोरोना झाल्यानंतर गरोदर मातांना धोका अधिक आहे. त्यामुळे लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे गरोदर व स्तनदा मातांनी कोणतीही भीती न बाळगता स्वत:हून पुढे येऊन लस घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञ डॉक्टरांनी संपूर्ण तपासणी केल्यानंतरच ही लस उपलब्ध केली आहे.
-डॉ. निवृत्ती राठोेड, शल्यचिकित्सक
------
मी लस घेतलीय, तुम्ही पण घ्या
कोरोनाच्या दोन्ही लस सुरक्षित आहेत. त्यामुळे शासनाने स्तनदा मातांना लसीकरण देण्यास सुरुवात करताच मी स्वयंस्फूर्तीने लस घेतली. लसीकरणाने शरीरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ॲन्टिबॉडीज तयार होत असतात. परिणामी कोरोनाचा धोका कमी आहे. त्यामुळे सर्व स्तनदा माता व गर्भवती मातांनी कोणतीही भीती न ठेवता लस घ्यावी.
डॉ. रुपाली बोम्मावार