जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्सूनपूर्व पाहणी
By Admin | Updated: May 17, 2015 01:34 IST2015-05-17T01:34:10+5:302015-05-17T01:34:10+5:30
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दाताळा पूल, रहेमतनगर व रामाळा तलावाची मान्सुनपूर्व पाहणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्सूनपूर्व पाहणी
चंद्रपूर : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दाताळा पूल, रहेमतनगर व रामाळा तलावाची मान्सुनपूर्व पाहणी केली. रामाळा तलावातील अतिक्रमण हटविणे, संरक्षण भिंत व उद्यानातील दुरूस्ती याबाबत या पाहणीत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
यावेळी मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम. शेख, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, नियोजन अधिकारी एम. एम. सोनकुसरे, कार्यकारी अभियंता लेहगावकर, उपअभियंता वानखेडे, नगरसेवक संजय वैद्य, सिंचन विभागाचे अभियंता सोनवणे व अधिकारी उपस्थित होते.
दाताळा येथील पुलाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. पावसाळ्यापूर्वी घेण्याच्या खबरदारीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यानंतर रहेमतनगर येथे भेट देऊन पूरप्रवण भागाची पाहणी केली. गेल्या वर्षी रहेमतनगर भागात पुराचे पाणी आले होते. या पाहणीत जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या. नाली सफाईचे काम तत्काळ करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
रामाळा तलावाची पाहणी करताना तलावातील गाळ काढणे व संरक्षण भिंतीची दुरूस्ती तत्काळ करावी, असे निर्देश दिले. त्याचप्रमाणे रामाळा तलाव येथील उद्यानाला त्यांनी भेट दिली. उद्यानातील भिंतीचे अंदाजपत्रक सिंचन विभागाने तत्काळ तयार करून दुरूस्ती करावी. या उद्यानात सायन्स पार्क उभारणे व बालोद्यानाची दुरूस्ती याबाबतचा आढावा त्यांनी घेतला.
उद्यानात जाण्यासाठी गंजवार्डकडून रामाळा तलावावर फुटवे (पादचारी पूल) सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ तयार करावा व तलावाच्या पाळीवर वाहनासाठी पार्किंग व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. यावेळी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)