शक्तिशाली स्फोटांनी पोवनी गाव हादरतेयं
By Admin | Updated: April 7, 2016 00:39 IST2016-04-07T00:39:33+5:302016-04-07T00:39:33+5:30
वेकोलित कोळसा उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे पोवनी गावातील अनेक नव्या जुन्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेले आहेत.

शक्तिशाली स्फोटांनी पोवनी गाव हादरतेयं
लोकप्रतिनिधी लक्ष देईना : वेकोलिच्या मुजोर प्रशासनापुढे गावकरी हतबल
प्रकाश काळे गोवरी
वेकोलित कोळसा उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे पोवनी गावातील अनेक नव्या जुन्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेले आहेत. वेकोलितील दुष्परिणामाचा नाहक फटका नागरिकांना बसत असून स्फोटांमुळे गावकऱ्यांचे आयुष्यच हादरले आहे. जनतेचे सेवक समजले जाणारे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने गावकरी आता निराधार झाले आहेत.
राजुरा तालुक्यातील गोवरी-कवठाळा या मुख्य मार्गावरील तालुका स्थळापासून १२ कि.मी. अंतरावर असलेले पोवनी गाव वेकोलिच्या कुशीत वसले आहे. सभोवताल कोळसा खाणी व मातीचे महाकाय ढिगारे असल्याने जवळ गेले तरी गाव दिसत नाही. मातीच्या ढिगाऱ्यावर वन्यप्राण्यांचा दिवस-रात्र हैदोस सुरू असतो. त्यामुळे गावकरी वैतागले आहेत. मातीचे ढिगारे हटविण्यासाठी गावातील ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी वेकोलिला अनेकदा निवेदन दिले.
मात्र वेकोलिच्या मुजोर प्रशासनाने आश्वासन देण्याखेरीज दुसरे काहीच केले नाही. वेकोलिच्या प्रतापाचे हे सारे दुष्परिणाम गावकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. गावकऱ्यांची ही आजची समस्या नाही तर ज्या दिवशीपासून वेकोलिचा कोळसा खाणीचे निर्माण झाले. तेव्हापासून वेकोलि प्रशासनाने गावकऱ्यांना वेठीस धरले आहे. मात्र जनतेचे सेवक समजले जाणारे मायबाप लोकप्रतिनिधी या नागरिकांच्या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाही.
पोवनी गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा मुख्य मार्गालगत आहे. या ठिकाणापासून कोळसा खाणीजवळ आहे. वेकोलित कोळसा उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या ब्लॉस्टिंगचे आवाज विद्यार्थी व गावकऱ्यांच्या कानावर सारखे घोंगावत असतात. हे स्फोटाचे आवाज क्षणभर नागरिकांच्या काळजात धडकी भरविणारे आहे. या गावातील नागरिकांच्या जमिनी वेकोलिने कोळसा खाणीसाठी घेतल्याने जमिनीचा तुकडाही आता शिल्लक राहिला नाही. त्यामुळे गावात राहून काय करायचे, या विचाराने बहुतांश नागरिकांनी शहराच्या ठिकाणी स्थानांतरण केले आहे. त्यामुळे गाव आता ओस पडायला लागले आहे. पूर्वी सारखी मजा आता गावात राहिली नसल्याचे गावकरी सांगतात.
प्रस्तुत प्रतिनिधीने पोवनी गावाला भेट दिली असता वेकोलित घडवून आणल्या जाणाऱ्या शक्तिशाली स्फोटांमुळे अनेक नव्या, जुन्या इमारतींना अल्पावधीतच तडे गेल्याचे दिसून आले. तर काही घरांच्या भिंती कोसळण्याच्या मार्गावर असल्याने कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. स्फोटांची तीव्रता इतकी असते की ब्लास्टिंगमुळे घरातील भांडी व घर अनेकदा हालत असल्याचे गावकरी सांगतात.
गाव लहान असल्याने गावात विकासाची गंगा वाहने आवश्यक आहे. मात्र येथील चित्र उलट असून गावाला प्रशासनाकडून विकासासाठी तोकडा निधी मिळत असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्यामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली आहे. गावातील ग्रामपंचायतीने आता लक्ष देणे सोडून दिल्याचे दिसते.