सत्तेसाठी नातेवाईकांसह मित्र बनले राजकीय शत्रू

By Admin | Updated: October 28, 2015 01:20 IST2015-10-28T01:20:52+5:302015-10-28T01:20:52+5:30

चिमूर नगर परिषद निवडणुकीचे काऊंटाडाऊन सुरु झाले आहे. प्रचारासाठी अवघे चार दिवस उरले आहेत.

Powerful enemies became friends with relatives | सत्तेसाठी नातेवाईकांसह मित्र बनले राजकीय शत्रू

सत्तेसाठी नातेवाईकांसह मित्र बनले राजकीय शत्रू

प्रचारात रंगत : मामी-भाचीसह, जावा-जावा एकमेकांविरुद्ध मैदानात
खडसंगी: चिमूर नगर परिषद निवडणुकीचे काऊंटाडाऊन सुरु झाले आहे. प्रचारासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी बरोबरच प्रचाराच्या आखाड्यात राज्यस्तरीय नेतेही उतरले आहेत. त्यामुळे क्रांतीभूमी चिमूरचे रणांगण पेटले आहे. सत्तेसाठी नातेवाईकांसह मित्रही आता राजकीय शत्रू बनले आहेत.
चिमूर शहराची ग्रामपंचायत इतिहास जमा झाली आहे. मात्र मागील ग्रामपंचायतीमध्ये सतरा सदस्य होते. त्यामध्ये काँग्रेस, शिवसेना, मनसे अशी अभद्र युती करुन पाच वर्षात अनेक घडामोडी झाल्यात. मात्र ग्रामपंचायत असल्याने त्या निवडणुकीकडे मोठ्या राजकीय पक्षांचे पुढारी तेवढे लक्ष देत नव्हते. तर राजकीय पक्षाच्या चिन्हांचा वापरही करण्यात येत नव्हता. मात्र आता नगरपरिषद झाल्याने राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या जात असल्याने ही निवडणूक सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी प्रतिष्ठेची केली आहे.
प्रचाराला अवघे चार दिवस उरल्याने आरोप- प्रत्यारोपांच्या फैरीतून मागील विधानसभा, लोकसभा, निवडणुकीतील उट्टे काढत भविष्यातील वाटचाल निश्चित केली जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांच्या पक्षाविरुद्ध प्रचंड इर्षा आणि खुन्नस काढली जात आहे. त्यामुळे एकमेकांवर खालच्या स्तरावरुन आरोप करुन टीका केली जात आहे.
भाजप व शिवसेना पक्षाचे काही प्रमाणात विचार एक आहेत. त्यामुळेच देशात व राज्यातील सत्तेत दोन्ही पक्ष एकत्रित आहेत. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकामध्ये दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढले. तेव्हापासूनच वरच्या राजकारणापासून तर स्थानिक पातळीवरही सेना- भाजपाचे जमले नाही.
नगरपरिषदेमध्ये सर्वच पक्षानी स्वबळावर सत्ता स्थापनेची स्वप्ने पहात ‘एकला चलो रे...’ ही भूमिका स्वीकारली आहे, तर सत्तेसाठी वाटेल ते करण्याचा निर्धार उमेदवारांनी केला आहे. प्रचारासाठी पक्षाचे नेते मंडळी प्रभागासह झोपडपट्ट्या पालथ्या घालत आहेत. पायपीट करुन पक्षाच्या उमेदवारांना नगरपरिषदेत पाठविण्यासाठी विणवणी करीत आहेत. प्रचारसभेसाठी राज्यस्तरीय नेत्यांना आमंत्रित केले जात आहे. विरोधकांच्या ‘विक पार्इंट’ची माहिती पुरवून जखमेवर मीठ चोळले जात आहे. नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक असल्याने साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अनेक प्रभागामध्ये नातेवाईकांसह पक्के दोस्त आमने-सामने ठाकून निवडणूक लढवित आहेत. मामी-भाची, जावा-जावा, मित्र-मित्र एकमेकाविरुद्ध मैदानात उतरल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)

Web Title: Powerful enemies became friends with relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.