एका लाईनमनवर सहा गावांचा वीज पुरवठा

By Admin | Updated: May 14, 2015 01:48 IST2015-05-14T01:48:46+5:302015-05-14T01:48:46+5:30

विद्युत वितरण कंपनीचे पोंभूर्णा सर्कलमध्ये देवाडा खुर्द हे मोठे गाव आहे.

Power supply for six villages on one line network | एका लाईनमनवर सहा गावांचा वीज पुरवठा

एका लाईनमनवर सहा गावांचा वीज पुरवठा

पोंभूर्णा: विद्युत वितरण कंपनीचे पोंभूर्णा सर्कलमध्ये देवाडा खुर्द हे मोठे गाव आहे. या गावासह जाम तुकूम, जामखुर्द, रामपूर दीक्षित, हस्तीबोडी ही गावे जोडण्यात आली आहे. या गावात महावितरणाचे एकच कर्मचारी कार्यरत आहेत. देवाडा खुर्द येथे दोन दिवसाआड डिपी उडणे नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे एकाच कर्मचाऱ्यावर या गावांचा भार असल्याने ते पाहिजे त्या प्रमाणात विद्युत सेवा देऊ शकत नाही. परिणामी स्थानिक नागरिकांना अनेकदा अंधारात राहावे लागत आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकवस्तीचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवाडा खुर्द येथे सहा गावांसाठी एका लाईनमनची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर परिसराचा विस्तार मोठा असल्याने एका लाईनमनवर कामाचा ताण पडत आहे. तेदेखील पाहिजे त्या प्रमाणात काम करीत नसल्याने स्थानिकांना अनेकदा अंधारात राहावे लागत आहे. याठिकाणी अनेकदा कोणता ना कोणता वीज पुरवठ्यात बिघाड होत असतो. आणि असा बिघाड नेमका सायंकाळच्या वेळी होत असल्याने मोठी पंचायत होते. एक बिघाड दुरुस्त केल्यास दुसरा बिघाड निर्माण होतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेकदा अंंधाराचा सामना करावा लागतो. तर कधी कधी सदर कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी असल्याचे सांगतात. त्यामुळे विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू होण्यास दोन ते तीन तासांचा अवधी लागतो. याबाबत पोंभूर्णा येथील महावितरण केंद्रात दूरध्वनीवरुन विचारणा केली असता ते बोलायला तयार नसतात. तर वरिष्ठ अधिकारी मात्र रात्रीच्या वेळी सोईच्या शहरात वास्तवाला राहतात. तेसुद्धा आपला दूरध्वनी बंद ठेवतात.
या नेहमीच्या खंडीत होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे महागड्या घरगुती वापरातील यंत्रावर परिणाम होत आहे. ते भविष्यात निकामी होऊ शकतात.
एखाद्या नागरिकांनी एक महिन्याचे बिल भरले नाही तर वरिष्ठांकडून आदेश असल्याचे सांगून चटकन त्या नागरिकाचा विद्युत पुरवठा खंडीत केला जातो. मग विद्युत पुरवठा खंडीत होत असताना तो तात्काळ सुरू करण्याचे सौजन्य मात्र महावितरण का दाखवित नाही, असा प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Power supply for six villages on one line network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.