वीज समस्येने १६ गावे त्रस्त

By Admin | Updated: June 15, 2015 01:12 IST2015-06-15T01:12:19+5:302015-06-15T01:12:19+5:30

चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या नागरी-माढेळी जि.प. सर्कलमधील जवळपास १६ गावे विजेच्या खेळखंडोब्याने त्रस्त आहेत.

The power crisis plagued 16 villages | वीज समस्येने १६ गावे त्रस्त

वीज समस्येने १६ गावे त्रस्त

नागरी (रेल्वे): चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या नागरी-माढेळी जि.प. सर्कलमधील जवळपास १६ गावे विजेच्या खेळखंडोब्याने त्रस्त आहेत. गेल्या तीन दिवसांपासून या गावातील वीज पुरवठा बंद होता. त्यामुळे शनिवारी रात्री त्रस्त झालेल्या आमडी या गावातील शेकडो नागरिकांनी माढेळी येथील ३३ केव्ही केंद्रावर धडक देऊन अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. त्यातून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी पोलिसांना पाचारण करावे लागले. रात्री उशिरा वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर तणाव निवळला.
ही सर्व गावे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या लगत आहेत. या १६ गावांमध्ये माढेळी येथून ३३ केव्ही पॉवर स्टेशनमधून वीज पुरवठा होतो. मात्र तीन दिवसांपासून हा वीज पुरवठा बंद होता. परिणामी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. विजेअभावी पाणी पुरवठा योजना बंद असल्यामुळे नागरी-माढेळीसह इतर गावातील नागरिकांचे चांगलेच हाल झालेत.
लगतच्या वर्धा जिल्ह्यातील दोन किलोमिटरवरील गावात वीज पुरवठा असतो. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील सीमावर्ती गावात वीज पुरवठा ठप्प असतो. वादळ आणि वातावरणामुळे ब्रेकडाऊन आहे. काम सुरू आहे, अशी उत्तरे दिले जातात.
तत्कालिन कार्यकारी अभियंता बाबासाहेब जाधव यांच्या कार्यकाळात या केंद्राला आयएसओ मानांकन देण्यात आले. पण आता त्याच विभागातील कर्मचारी व अधिकारी पॉवर स्टेशनमध्ये वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ठ असल्याचा कांगावा करीत आहेत. त्यामुळेच या गावांमध्ये विजेची समस्या निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे. या केंद्रात पुरसे कर्मचारी नसल्याने वीज वितरणातील त्रुट्या दूर करण्यासाठी अडचणी जात आहेत. (वार्ताहर)

Web Title: The power crisis plagued 16 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.