वीज जोडणी व रस्ता रुंदीकरणाचा नळ योजनांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST2021-03-22T04:25:27+5:302021-03-22T04:25:27+5:30
घनश्याम नवघडे नागभीड : स्थापत्य कामे पूर्ण झाली असली तरी तालुक्यात वीज जोडणीअभावी अनेक नळयोजना बंद असून, तालुक्यातील काही ...

वीज जोडणी व रस्ता रुंदीकरणाचा नळ योजनांना फटका
घनश्याम नवघडे
नागभीड : स्थापत्य कामे पूर्ण झाली असली तरी तालुक्यात वीज जोडणीअभावी अनेक नळयोजना बंद असून, तालुक्यातील काही नळयोजनांना रस्ता रुंदीकरणाचाही फटका बसला आहे, तर अनेक नळयोजना मंजुरी प्रक्रियेत अडकून असल्याची माहिती आहे.
प्रत्येक व्यक्तीला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळाले पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. या दृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरूही आहेत. सध्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून ‘हर घर नल से जल’ ही मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत असली तरी काही बाबींमुळे या मोहिमेला अपयश येते की काय अशी परिस्थिती आहे.
नागभीड तालुक्यातील इरव्हा, गिरगाव येथील पूरक नळयोजना, गोविंदपूर आणि कचेपार येथील नळयोजनांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती आहे. स्थापत्य कामे पूर्ण झाल्यानंतर या नळयोजनांसाठी वीज जोडणीची मागणी करण्यात आली असली तरी ही वीज जोडणी देण्यात न आल्याने लोकांना शुद्ध व मुबलक पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील काही नळयोजना रस्ता रुंदीकरणाच्याही बळी ठरल्या आहेत. रस्ता रुंदीकरणात पाईपलाईन फुटल्यामुळे व वीज जोडणी कापण्यात आल्याने कोर्धा, पांजरेपार, कोथुळणा, बाळापूर (बुज) आणि पारडी ठवरे येथील नळयोजना बंद पडल्या आहेत.
जलजीवन मिशन अंतर्गत अनेक नळयोजनांची दुरुस्ती व पूरक कामे हाती घेण्यात आली असून, ती मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आली असली तरी या नळयोजना मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यात मेंढा, कोटगाव, आलेवाही, नवेगाव हुं, कोसंबी गवळी, धामनगाव चक, कोदेपार, सारंगड खडकी, देवपायली कसर्ला व आणखी काही गावांचा समावेश आहे. मात्र, या पूरक कामांना मंजुरी मिळत नसल्याने या गावातील नागरिकांना पुरेशा पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
बॉक्स
पाण्याची पातळी खालावली
उल्लेखनीय बाब ही की नागभीड तालुक्याची पावसाची सरासरी १२५६ मिमी असली तरी यावर्षी केवळ ४६५.८ मिमी एवढाच पाऊस पडला आहे. ही सरासरी ३७ टक्के असून, सरासरीपेक्षा तब्बल ६३ टक्के कमी आहे. परिणामी पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात असून, याचे परिणाम या उन्हाळ्यात जाणवण्याची शक्यता आहे. म्हणून या योजनांमधील दोष त्वरित दूर करून लोकांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.