‘ड्राय डे’ला बनावट दारुची विक्री होण्याची शक्यता
By Admin | Updated: October 12, 2014 23:42 IST2014-10-12T23:42:14+5:302014-10-12T23:42:14+5:30
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ ते १६ आॅक्टोबरपर्यंत सर्व दारू विक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांच्या या ‘ड्राय डे’ दरम्यान मोठ्या

‘ड्राय डे’ला बनावट दारुची विक्री होण्याची शक्यता
चंद्रपूर : निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने १३ ते १६ आॅक्टोबरपर्यंत सर्व दारू विक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवसांच्या या ‘ड्राय डे’ दरम्यान मोठ्या प्रमाणात बनावट दारूची विक्री होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांची सर्व दारू विक्री दुकानांवर नजर राहणार असली तरी मद्यपींनी मात्र, मद्याचा साठा करुन ठेवण्यावर भर दिला आहे.
१५ आॅक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी १३, १४, १५ व धम्म अनुवर्तन दिन १६ आॅक्टोबरला असल्याने या दिवशी जिल्हा प्रशासनाने दारू दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसे सर्व बिअर बार चालकांना पत्र पाठविण्यात आले असून ड्राय डेला दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे.
जिल्हा प्रशासनाने कितीही करडी नजर ठेवून दारू विक्री बंद ठेवली तरी छुप्या मार्गाने दारू विक्री होतच असते, हे आजवरचे चित्र आहे. शहरात व सिमेलगत गुप्त ठिकाणी बनावट दारू तयार होत असून या दारूची आयात करुन ड्राय डे दरम्यान विक्री होण्याची शक्यता आहे. लगतच्या राज्यातूनही दारुची आयात होण्याची शक्यता असून या दारुविक्रीवर आळा घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
निवडणूक काळात कार्यकर्त्यांकडून दारूची मोठ्या प्रमाणात मागणी होते. निवडणुकीच्या पार्ट्यांमध्ये मद्याशिवाय रंग भरत नाही, हे आजवरचे चित्र आहे. त्यामुळे निवडणूकीच्या काळात सर्वात जास्त दारुचा पूर वाहतो. दरवर्षीच्या तुलनेत चालू महिन्यात जास्त दारुविक्री करणाऱ्या जिल्ह्यातील सात दुकानांना जिल्हा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे वाजवी पेक्षा जास्त दारूची विक्रीची करणाऱ्या बिअर बार, वाईन शॉपवर प्रशासनाची नजर आहे. तीन दिवसांचा ड्राय डे असल्याने अनेक मद्यपींनी दारू दुकानात गर्दी करुन तीन दिवस लागणाऱ्या मद्याचा साठा करुन ठेवला आहे.
या तीन दिवस जिल्ह्यातील सर्व दारु दुकाने बंद राहणार असल्याने उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त असणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र, चांगलाच हिरमोड झाला आहे. त्यामुळे काही उमेदवारांनी दारु साठा बुक केला आहे. विश्वासू कार्यकर्त्यावर दारूचे नियोजन सोपविण्यात आले आहे. १३ ते १६ तसेच मतमोजणीच्या दिवशी १९ आॅक्टोबरला दारू दुकाने बंद राहतील. त्यामुळे मद्यपींची अडचण होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)