वीज केंद्राच्या सुरक्षा भिंतीवरील फलकांमुळे अपघाताची शक्यता
By Admin | Updated: April 1, 2015 01:16 IST2015-04-01T01:16:28+5:302015-04-01T01:16:28+5:30
चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राअंतर्गत मेजर स्टोअर प्रवेशद्वाराच्या सुरक्षा भिंतीवर नियमांची पायमल्ली करीत गेल्या अनेक दिवसांपासून अवैधपणे शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत.

वीज केंद्राच्या सुरक्षा भिंतीवरील फलकांमुळे अपघाताची शक्यता
दुर्गापूर : चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राअंतर्गत मेजर स्टोअर प्रवेशद्वाराच्या सुरक्षा भिंतीवर नियमांची पायमल्ली करीत गेल्या अनेक दिवसांपासून अवैधपणे शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. हे फलक रहदाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. संबंधित व्यवस्थापनाने या फलकांची तात्काळ विल्हेवाट लावून कारवाई करण्याची मागणी आहे.
चंद्रपूर-ताडोबा मार्गावर ऊर्जानगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत वीज निर्मिती केंद्राचे प्रवेशद्वार आहे. त्याभोवती सुरक्षा भिंत आहे. या भिंतीवर राजकारण्यांनी विनापरवाना अवैध शुभेच्या फलक लावले आहेत. अनेक दिवसांचा कालावधी लोटूनही ही शुभेच्छा फलके अद्यापही या सुरक्षा भिंतीवर टांगलेलीच आहेत. यामुळे नियमांची पायमल्ली होत आहे. हे फलक चंद्रपूर- ताडोबा मार्गावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत असल्याने येथे अपघाताची शक्यता बळाली आहे.
फलक लावण्याआधी परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र येथे विना परवाना अनेक शुभेच्छा फलके लावण्यात आली आहेत. एकदा येथे फलक लागले की, ते कुणीही काढत नसल्याचा नित्याचाच अनुभव आहे.
मेजर स्टोअर गेट वीज केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार असल्याने येथून वीज केंद्र व्यवस्थापनाचे बडे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार, कंत्राटी कामगार आत जातात. अशा लोकांना या भागात आपलाच दबदबा आहे, हे दर्शविण्यासाठी येथे संधासाधू लोकांकडून बेकायदेशिररित्या शुभेच्छा फलक लावले जात आहेत. वीज केंद्राच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचाऱ्यांची चौकी आहे. येथून हे फलक त्यांच्या नजरेस पडते. मात्र येथील सुरक्षा विभाग याविरुद्ध कोणतीही कारवाई करीत नाही. अवैधपणे लावण्यात आलेल्या या फलकांची तात्काळ विल्हेवाट लावण्याची मागणी आहे. (वार्ताहर)