कोरपना : तालुक्यातील कोडशी खुर्द ते पिपरी हा पांदण रस्ता स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही दगडधोंड्यांचाच आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
हा मार्ग पिपरी येथील ग्रामस्थांना वणी शहर तसेच कोडशीच्या नागरिकांना वणसडी गाठण्यासाठी अत्यंत जवळचा आहे. परंतु पक्का रस्ता नसल्याने १५ किलोमीटर अधिकचे अंतर मोजून कोडशी येथे इतरत्र मार्गाने जावे लागत आहे. पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचत असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचण निर्माण होते. या रस्त्याचे रूपांतर पक्क्या रस्त्यात करण्यात यावे व नाल्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांमार्फत होत आहे. मात्र यावर आजतागायत कुठलीही पावले उचलली गेली नाहीत. परिणामी, रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. याकडे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.