खडसंगी येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:25 IST2021-01-18T04:25:59+5:302021-01-18T04:25:59+5:30
चिमूर- वरोरा राज्य मार्गावरील खडसंगी येथील बस स्टॅन्डची दुरवस्था झाली असून ते अस्वच्छ असल्यामुळे ये- जा करणारे प्रवासी ...

खडसंगी येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
चिमूर- वरोरा राज्य मार्गावरील खडसंगी येथील बस स्टॅन्डची दुरवस्था झाली असून ते अस्वच्छ असल्यामुळे ये- जा करणारे प्रवासी जवळ असलेल्या पानटपऱ्यांवर वाहनांची वाट पाहत असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे.
खडसंगी हे गाव येथील मध्यवर्ती भागी असलेले गाव असून येथे अनेक गावांचे प्रवासी येतात. शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी सकाळी नेहमी बसथांब्यावर बसची वाट पाहत थांबतात; परंतु येथील बस स्टॅन्डवर बसण्यासाठी असलेल्या जागेत नेहमी कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते. खूप दिवस होऊनही कचऱ्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. या सर्व बाबीचा परिणाम येथील प्रवाशांच्या आरोग्यावर होतो.
बसण्यासाठी असलेली आसनेसुद्धा तुटून पडली असल्याने या बाबीकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही.
बस थांबण्याच्या जागेवर खासगी ऑटोरिक्षा सकाळी रांगेत उभे असल्यामुळे येणाऱ्या बसला खूप दूर थांबावे लागते. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बस पकडण्यासाठी नाहक त्रास सहन करावे लागते.
या सर्व बाबीवर संबंधित विभागाने लक्ष देऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी येथील जनतेने केली आहे.