तालुक्यात एकूण १५५ गावे आहेत. या गावातील विकासावर दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात, परंतु सगळ्या नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला स्मशानभूमीच्या विकासाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षाचा कालावधी लोटत आहे, गावाच्या प्राथमिक सुविधा पैकी स्मशानभूमी ही महत्त्वाची गरज असताना आजही तालुक्यातील काही गावात हक्काची स्मशानभूमी नाही. घरात दुःखाचे सावट असताना नागरिक मिळेल तिथे मरण यातना भोगत अंत्यविधी करताना दिसतात. तर ज्या गावात स्मशानभूमी जागा उपलब्ध आहे, त्यापैकी बहुतेक ठिकाणी उभे राहायला सुद्धा जागा नाही. सगळीकडे काटेरी झुडपे, तरोटा वाढला असून पाण्याचा तर पत्ताच नाही. अनेक गावातील स्मशानभूमीला रस्ते नाहीत. पावसाळ्यात स्मशानभूमीत पोहोचणे शक्य होत नसल्याने जागा मिळेल तिथे अंत्यविधी करावा लागत आहे. धोका पत्करून काळोखात अंत्यसंस्कार करावे लागते. प्रशासन लोकप्रतिनिधींना विकास आराखडा तयार करून १५ व्या वित्त आयोगातून व लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतून ग्रामपंचायतीमार्फत स्मशानभूमीचा विकास करता येते. आता नागरिकांनी सुद्धा अशी मागणी केली आहे.
सिंदेवाही तालुक्यातील स्मशानभूमीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:25 IST