मतदान प्रक्रिया शांततेत

By Admin | Updated: November 2, 2015 00:53 IST2015-11-02T00:53:06+5:302015-11-02T00:53:06+5:30

चिमूर नगर परिषद आणि सावली व पोंभुर्णा नगर पंचायत निवडणुकीसाठी आज रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.

Polling process in peace | मतदान प्रक्रिया शांततेत

मतदान प्रक्रिया शांततेत

चंद्रपूर : चिमूर नगर परिषद आणि सावली व पोंभुर्णा नगर पंचायत निवडणुकीसाठी आज रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. चिमुरात एका उमेदवाराविरुध्दची तक्रार वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. चिमुरात ७० टक्के, सावलीत ७३.२१ टक्के तर पोंभूर्णात ७६.२० टक्के मतदान झाले. उद्या २ नोव्हेंबरला सावली, पोंभूर्णा व चिमूर तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
चिमुरात १७१ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद
खडसंगी : चिमूर नगरपरिषद निर्मितीच्या श्रेयासाठी प्रचाराच्या रणधुमाळीत गाजलेल्या चिमूर नगर परिषदेच्या १७ वार्डासाठी अंदाजे ७० टक्के मतदान झाले. २४ मतदान केंद्रात मतदान शांततेत पार पडले.
आजी व माजी आमदारांनी प्रतिष्ठेची केलेली नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस, भाजपात चांगलीच स्पर्धा दिसून आली. तर शिवसेना व इतर पक्षांनी या पलिकडे जावून आपल्या मतदारांना आकर्षित करण्याकरिता वेगळी रणनीती आखल्याचे दिसले.
चिमूर शहरातील ग्रामपंचायत इतिहास जमा होत चिमूरला नगरपरिषदेचा दर्जा दिला. त्यामुळे चिमूर येथील मतदारामध्ये उत्साह असला तरी काही प्रभाग सोडता ३ वाजेपर्यंत मतदारराजा घरीच बसून राहिला. त्यामुळे दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर पाहिजे त्या प्रमाणात गर्दी नसल्याचे चित्र होते. त्यामुळे मतदार कामात व्यस्त आहेत की रुसून बसले आहेत, याची खातरजमा करताना अनेक उमेदवार दिसून येत होते..
११ गावांचा समावेश असलेल्या चिमूर नगरपरिषदेमध्ये १९ हजार ६५३ मतदार आहेत. सायंकाळी ४ पर्यंत २४ केंद्रावर कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. प्रभाग क्रमांक १० व प्रभाग क्रमांक १२ या केंद्रावर मतदारासह कार्यकर्त्यांची चांगलीच रेलचेल होती. प्रभाग क्रमांक १५ वर माजी सरपंच मनिष नंदेश्वर आपले भाग्य अजमावीत आहेत. प्रभाग क्रमांक पाच व प्रभाग क्रमांक सहामध्ये राजकीय पुढाऱ्यांचे विशेष लक्ष असल्याने मतदारासह पुढाऱ्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सर्व २४ मतदान केंद्रावर सायंकाळी ५ वाजेपर्यंत शांततेत मतदान पार पडले. मात्र वडाळा (पैकु) बुथवर मतदारांनी उशिरा हजेरी लावल्यामुळे उशिरापर्यंत मतदान सुरू होते. सर्व केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. १७१ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला सोमवारी १० वाजतापासून होणार आहे. मतमोजणीकरिता चार टेबल लावण्यात येणार आहे. यासाठी चोख बंदोबस्त लावण्यात आला असून वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाद्वारे सांगण्यात येत आहे.
सावलीत दुपारनंतर वाढली मतदारांची गर्दी
सावली : नव्यानेच निर्माण झालेल्या नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रारंभी मतदारांचा निरुत्साह दिसून आला. मात्र दुपारनंतर मतदारांची केंद्रावर गर्दी वाढू लागली.
नगर पंचायतीमध्ये एकूण १७ प्रभाग होते. त्यात ७३.२१ टक्के मतदान झाले. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात मतदात्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७.३० वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सुरूवातीचे दोनतासपर्यंत अत्यंत मंदगतीने मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चाललेले मतदान ७३.२१ टक्क्यापर्यंत पोहचले.
अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात व शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. एकूण सात हजार ९५१ मतदारांपैकी पाच हजार ८२१ मतदारांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. मतदानापूर्वीच्या मध्यरात्री झालेला एका प्रभागातील क्षुल्लक वाद वगळता कोणताही अनूचित प्रकार घडला नाही. २ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता मतमोजणी तहसील कार्यालय सावली येथे पार पडणार आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. १७ प्रभागात एकुण ७७ उमेदवार मैदानात होते.
पोंभुर्णातही शांततेत
पोंभुर्णा : पोंभुर्णा नगरपंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून पोंभूर्ण्यात चांगलीच रणधुमाळी सुरू होती. आज सकाळी ७ वाजतापासून पोंभूर्ण्यात मतदानाला सुरूवात झाली. पोंभूर्ण्यात १७ प्रभागातील १७ उमेदवारांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. या १७ जागांसाठी तब्बल ७० उमेदवार रिंगणात उभे झाले आहेत. प्रशासनाने मतदानासाठी प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे १७ मतदान केंद्रांची व्यवस्था केली होती. (लोकमत चमू)

Web Title: Polling process in peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.