अपवाद वगळता मतदान शांततेत
By Admin | Updated: August 5, 2015 01:05 IST2015-08-05T01:05:34+5:302015-08-05T01:05:34+5:30
जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीपैकी ६१० ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली.

अपवाद वगळता मतदान शांततेत
चंद्रपूर : जिल्ह्यातील ६२८ ग्रामपंचायतीपैकी ६१० ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. ६१० ग्रामपंचायतीच्या एकूण दोन हजार २५ जागांसाठी ११ हजार १३४ उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत. मतदानासाठी २ हजार १४७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. नागभीड तालुक्यात मारहाण झाली. आक्सापूर, शंकरपूर व नेरी येथील मशीनमध्ये बिघाड आणि मोहबाळा येथे बोगस मतदानाचा आरोप, या घटना सोडल्या तर उर्वरित ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती. असे असतानाही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली नाही. उलट उत्स्फूर्ततेने आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात सरासरी ७५ ते ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय रामटेके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच तालुक्यात मंगळवारी सकाळपासून पाऊस सुरू होता. तुरळक पाऊस असला तरी त्याची रिपरिप रात्री उशिरायपर्यंत सुरूच होती. त्यामुळे आजच्या मतदानावर पावसामुळे परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र मतदारांनी ही भीती अनाठायी ठरवित मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
जिल्ह्यातील एकूण ६२८ ग्रामपंचायतीपैकी अविरोध ग्रामपंचायती वगळल्या तर ६१० ग्रामपंचायतीसाठी आज मतदान घेण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात मतदानासाठी एकूण दोन हजार १४७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. ६१० ग्रामपंचायतीच्या दोन हजार २५ जागांसाठी ११ हजार १३४ उमेदवार रिंगणात आहेत. तर एकूण ८ लाख ३८ हजार ४८१ मतदारपैकी ७५ ते ८० टक्के मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला.
पाऊस असतानाही सकाळपासूनच मतदानाची टक्केवारी चांगली होती. बहुतांश मतदान केंद्रांवर दुपारी १२ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान झाले होते. पाऊस सुरू असल्याने उमेदवारांना मतदान बुधवर आणण्यासाठी तीन चाकी किंवा चार चाकी वाहनांचा उपयोग करावा लागला. मात्र बाहेरगावात राहणाऱ्या मतदारांना आणणे उमेदवारांना पावसामुळे कठीण झाले होते. वयोवृध्द नागरिकांनाही बुधवर आणण्यासाठी उमेदवारांनी वाहनांची व्यवस्था केल्याचे दिसून आले. काही मतदान केंद्रांवर मात्र वयोवृध्द नागरिक स्वत:च उस्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्याचेही दिसून आले.
गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूर येथील एका मतदान केंद्रातील मशीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे या केंद्रावर तीन तास मतदान प्रक्रियेला विलंब झाला. चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील वार्ड क्रमांक १ मधील व नेरी येथील वार्ड क्रमांक ३ मधील मतदान मशीनमध्येही बिघाड झाला. मात्र तो दुरुस्त करून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. मात्र यामुळे मतदान प्रक्रिया काही तास खोळंबली होती. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच तालुक्यात ७५ ते ८० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, चिमूर तालुक्यातील नेरी येथे काल सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास शिवसेनेचे उमेदवार विलास डांगे आणि भाजपाचे डॉ. हटवादे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्याने अखेर दोघांनीही याबाबत एकमेकांविरुध्द भिसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे.
राजुरा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ४३५ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. पाऊस असतानासुद्धा तालुक्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाले. ८० टक्के मतदान झाले. चुनाळा, नलफळी, सिधी, धानोरा, गोवरी या सारख्या ग्रामपंचायतीमध्ये अतितटीच्या निवडणूका झाल्या.
ब्रह्मपुरी तालुक्यात ६७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीच्या मतदान प्रक्रिया १९९ केंद्रावर आली. काही चुरळक घटना सोडल्यास मतदान शांततेत पार पडले आहे. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. परंतु रात्रीपासून पाऊस असल्याने दुपारी १२ ववाजेपर्यंत २९ टक्के मतदान झाले होते. मतदानाच्या पूर्वसंध्येला काही घटना घडल्या. परंतु त्याचा परिणाम मतदानावर झाला नाही. मेंडकी येथे रात्री एक मतदार साड्या घेऊन जाताना काही उमेदवारांना आढळला. त्यामुळे या साहित्याचे वितरण कोणी केले, याबाबत विचारणा केली असता मतदाराने नाव न सांगितल्यान ेमेंडकी पोलीस स्टेशनला काही उमेदवारांनी तोंडी तक्रार दिल्याचे समजते. काही ग्रामीण भागात जिल्ह्यात दारूबंदी असताना दारूचा पूर वाहत असल्याचेही चित्र निर्माण झाले होते तर काही गावात दारूचा थेंबही पाहायला मिळाला नाही
वरोरा तालुक्यातील आनंदवन व येवती ग्रामपंचायतीच्या निवडणुका अविरोध तर एका ग्रामपंचायत निवडणुकीवर मतदारांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे आज ७६ ग्रामपंचायत सदस्य निवडण्याकरिता मतदान झाले. आज तालुक्यात सरासरी ७९ मतदान झाले. वरोरा तालुक्यात काल रात्रीपासून पाऊस सुरू होता. सकाळीही पाऊस सुरु असल्याने मतदार सकाळी घराबाहेर निघाले नसल्याने सकाळी ११ वाजेपावेतो मतदान संथगतीने सुरु होते. पाऊस सायंकाळपर्यंत उघडण्याची चिन्हे दिसत नसल्याने दुपारनंतर मतदार घराबाहेर निघायला लागले. अनेक मतदान केंद्राच्या बाहेर मंडप टाकण्यात आला नव्हता. ज्या मतदान केंद्रावर गर्दी झाली. तिथे मतदारांची गैरसोय झाली. अर्जुनी ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकीत एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. (शहर प्रतिनिधी)
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मंगळवारच्या मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनीही तगडा बंदोबस्त ठेवला होता. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह संबंधित ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सीआरपीएफच्या जवानांची तुकडी गावागावात गस्त घालताना दिसून आली. प्रत्येक मतदान केंद्र परिसरातही पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू झाल्यामुळे या मतदान प्रक्रियेत मद्यपींचा धिंगाणा दिसून आला नाही. त्यामुळे एखाद अपवाद सोडला तर कुठेही मारहाणीच्या घटना घडलेल्या नाही.
मोहबाळ्यात बोगस मतदान
मोहबाळा २३० मतदान केंद्रावर सकाळी १० वाजता एका युवकाने ६५ वर्षीय इसमाच्या नावावर मतदान केले. दुपारी ६५ वर्षीय इसम मतदानास आल्यावर तुमचे मतदान झाले, असे सांगण्यात आले. या इसमाने मतदान करण्याकरिता अर्ज दिला. त्यानंतर ६५ वर्षीय इसमास टेंडर बॅलेट पेपर देवून मतदान घेण्यात आले, अशी माहिती तेथील निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. शेगावमध्ये नाव आणि आडनाव सारखेच असलेल्या दोन महिला मतदार होत्या. त्यात एका महिलेने दुसऱ्या महिलेचा मतदान क्रमांक देवून मतदान केल्याने एका महिलेला मतदान करता आले नसल्याचे समजते.
नोटांच्या बटणामुळे
मतदारांमध्ये संभ्रम
चिमूर तालुक्यातील शिवापूर ग्रामपंचायतीमध्ये एका वार्डातील तीन उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. दोन पॅनल असल्याने एका इव्हीएम मशीनमध्ये दोन उमेदवारानंतर ‘नोटा’ची बटन, अशा एका मशीनमध्ये तीन ‘नोटा’च्या बटन असल्याने संभ्रम निर्माण झाला.
महिला उमेदवाराच्या
पतीचा मृत्यू
ब्रह्मपुरी तालुक्यातील दुधवाही ग्रामपंचायतीसाठी शकून केशव पारधी या निवडणूक रिंगणात आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी सोमवारी रात्री शकून पारधी यांचे पती केशव पारधी यांचा अचानक रस्त्यावर पडल्याने मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात होती. शकून पारधी यांच्या पॅनलच्या इतर उमेदवारांना आज मंगळवारी मतदान केंद्रांकडे आणि अंत्ययात्रेकडेही लक्ष द्यावे लागले.