चंद्रपूर मतदार संघात शांततेत पार पडले मतदान

By Admin | Updated: October 15, 2014 23:31 IST2014-10-15T23:31:30+5:302014-10-15T23:31:30+5:30

चंद्रपूर विधानसभा मतदार संघात बुधवारी शांततेत मतदान शांततेत पार पडले. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह होता. मात्र काही मतदान केंद्र वगळता अन्य ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या नाहीत.

Polling in peaceful Chandrapur constituency | चंद्रपूर मतदार संघात शांततेत पार पडले मतदान

चंद्रपूर मतदार संघात शांततेत पार पडले मतदान

७१-चंद्रपूर विधानसभा मतदार संघात बुधवारी शांततेत मतदान शांततेत पार पडले. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह होता. मात्र काही मतदान केंद्र वगळता अन्य ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या नाहीत. दुपारनंतर मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी महिलांची गर्दी दिसून आली. काही परिसरात वाहनांद्वारे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणले जात होते. दरम्यान, चंद्रपुरातील संजयनगरमधील राजीव गांधी महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक ८४ वरील ईव्हीएम मशीनमधून आवाज येत नसल्याने येथील मशीन दुरूस्त करण्यात आली. तोपर्यंत किमान अर्धा तास मतदानाची प्रक्रिया रखडून पडली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.३२ टक्के मतदान झाले होते.
बंद काळात मद्य आले कुठून?
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मागील १३ ते १६ आॅक्टोबरपर्यंत मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना याच काळात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारूची विक्री झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी मद्यपींचा उपद्रव दिसून आला. ही दारू आली कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मतदान केंद्र परिसरात असाही प्रताप
चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयामागील परिसरातील राजे धर्मराव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्र परिसरात एका मद्यपीने दुपारी मतदारांचे लक्ष वेधले. क्षमतेपेक्षा अधिक मद्यप्राशन केल्याने तो मतदान केंद्रापर्यंतही पोहचू शकला नाही. काही वेळाने त्याने रस्त्याच्या काठावरच स्वत:ला निद्रावस्थेत झोकून दिले.
एकाच केंद्रावर १ हजार ६६८ मतदार
चंद्रपुरातील वडगाव केंद्र क्रमांक ३१ जवळ तीन मतदान केंद्र असले तरी ३१ व्या क्रमांकाच्या मतदान केंद्रावर १ हजार ६६८ मतदार जोडण्यात आले. दुपारी २ वाजेपर्यंत यांपैकी केवळ २६० मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदानासाठी असलेल्या ११ तासांमध्ये या सर्व मतदारांना मतदान करावयाचे होते. मतदानासाठी असलेली वेळ आणि मतदारांची संख्या लक्षात घेता या मतदान केंद्रावरील मतदारांना अन्य मतदान केंद्रावर जोडणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने तसे केले नाही. परिणामी या मतदान केंद्रावर मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी पाच वाजता या मतदान केंद्रावर मतदारांची मोठी रांग लागली होती. नेमून दिलेल्या वेळेत आपल्याला मतदान करता येईल की नाही, याबाबत सांशकता होती.

Web Title: Polling in peaceful Chandrapur constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.