चंद्रपूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी उद्या मतदान
By Admin | Updated: April 16, 2016 00:38 IST2016-04-16T00:38:09+5:302016-04-16T00:38:09+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवार १७ एप्रिलला मतदान होणार आहे.

चंद्रपूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी उद्या मतदान
उमेदवारांच्या गुप्त बैठका : काँग्रेस व भाजपाच्या उमेदवारांत चुरस
चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवार १७ एप्रिलला मतदान होणार आहे. १८ जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार रिंगणात असून प्रचार तोफा थांबला आहे. उमेदवार आता गुप्त बैठका घेत आहेत. या बाजार समितीवर आजवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले असून या निवडणुकीत काँग्रेस व भाजपाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे असल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे.
सोमवारी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार असल्याने कोणत्या पक्षाचे वर्चस्व बाजार समितीवर प्रस्थापित होईल, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न दोन कोटींच्या घरात आहे. येथील संचालक मंडळाची मुदत ३१ डिसेंबर २०१५ रोजी संपुष्टात आली. त्यानंतर मात्र वर्षभर प्रशासक मंडळाने बाजार समितीचा कारभार सांभाळला आणि त्यानंतर शासकीय पॅनल बाजार समितीवर बसले होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या मतदारांत ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी संस्थेचे सदस्य, हमाल, मापारी, अडते आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी व रात्री उशिरापर्यंत बैठका घेत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. काही ठिकाणी तर मतदारांना खूश करण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन होत असल्याची चर्चा आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात १८ उमेदवारांचा समावेश असून सेवा सहकारी संस्थेच्या गटातून एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यातून ११ उमेदवारांना निवडूण द्यायचे आहेत. ग्रामपंचायत गटात सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यातून चार उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. व्यापारी-अडते मतदारसंघातून पाच उमेदवार असून, त्यातील दोन उमेदवारांना, तर हमाल-मापारी गटातून एक उमेदवार निवडून दिले जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीची चुरस वाढली असून उमेदवारांचे भाग्य सोमवारी कळणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)