पाईप चोरीप्रकरणाला राजकीय स्वरूप
By Admin | Updated: July 5, 2015 00:49 IST2015-07-05T00:49:21+5:302015-07-05T00:49:21+5:30
गडचांदूर नगर परिषदेमधील हातपंपाच्या पाईप चोरीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने ...

पाईप चोरीप्रकरणाला राजकीय स्वरूप
राष्ट्रवादीची पत्रकार परिषद : आईलवारची चौकशी करावी
गडचांदूर : गडचांदूर नगर परिषदेमधील हातपंपाच्या पाईप चोरीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणे सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते निलेश ताजणे यांनी पत्रकार परिषद घेऊन नगर परिषदेतील कर्मचारी बंडू आईलवार यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
छायाचित्रीकरणामध्ये बंडू आईलवार पाईप नेताना दिसत आहे. मात्र मुख्याधिकारी व पोलिसांनी आईलवारची साधी चौकशी केली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. नगराध्यक्षा विद्या कांबळे यांच्या सांगण्यावरुन आईलवारने पाईप चोरी केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीने केला. मुख्याधिकाऱ्यांनी नगर परिषदेमधील पाईप गहाळ झाल्याबद्दल अहवाल पोलिसांना दिला. अहवालात चोरीचा उल्लेख नसल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना अडचण येत आहे, असे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त नगरसेवक निवडून आल्यानंतरही सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. त्यामुळे स्वत:च कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून न.प.मधील पाईप माझ्या घराच्या आवारात टाकणे आणि त्याचे छायाचित्रण करणे अशी योजना आखून माझ्यासारख्या दलित महिलेला फसविण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्याधिकारी व पोलीस विभागाकडून चौकशी सुरू आहे. मात्र आरोपात तथ्य नसल्याचे त्यांच्याही निदर्शनास आले असावे.
विद्या कांबळे,
नगराध्यक्ष, गडचांदूर नगरपरिषद.