पॉलिश करून देण्याच्या नावाखाली दागिने पळविले

By Admin | Updated: March 2, 2016 00:25 IST2016-03-02T00:25:54+5:302016-03-02T00:25:54+5:30

दागिन्यांना पॉलिश करून देण्याची थाप मारून ते दागिनेच लंपास करणाऱ्या भामट्यांची टोळी चंद्रपुरात सक्रिय झाली आहे.

Polished jewelry in the name of polishing | पॉलिश करून देण्याच्या नावाखाली दागिने पळविले

पॉलिश करून देण्याच्या नावाखाली दागिने पळविले

नागरिकांत भीती : सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन
चंद्रपूर: दागिन्यांना पॉलिश करून देण्याची थाप मारून ते दागिनेच लंपास करणाऱ्या भामट्यांची टोळी चंद्रपुरात सक्रिय झाली आहे. मंगळवारी दुर्गापूर परिसरातून या भामट्यांनी अशा पद्धतीने ४० हजारांचे दागिने लंपास केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या टोळीचा शोध घेणे सुरू केले आहे.
ही घटना मंगळवारी दुपारी घडली. दुर्गापूर येथील रहिवासी किसन कुचनकार यांच्या घरी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात इसम आले. आम्ही सेल्समन आहोत. सोन्या-चांदीचे दागिने पॉलिश करून देतो, अशी थाप त्यांनी मारली. त्यावर विश्वास ठेवत किसन कुचनकार यांची सून सारीका हिने पायातील चांदीचे दोन चाळ काढून दिले.
त्या भामट्यांनी पावडरचा वापर करून ते चाळ स्वच्छ करून दिले. त्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिनेही साफ करून देतो, असे सांगितले. त्यावरही विश्वास ठेवून किसन कुचनकार यांच्या पत्नी शकुन यांनी १४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र गळ्यातून काढून दिले. ते साफ करताना गॅसवर दागिने गरम करायचे आहेत, असे सांगितले. त्यानंतर मंगळसूत्र व सोन्याची अंगठी एका स्टीलच्या डब्यात टाकले.
त्यानंतर दोन भामट्यांपैकी एक इसम स्वयंपाकगृहात गेला. यावेळी किसन कुचनकार यांची पत्नी व सूनदेखील तेथे गेले. डबा गॅसवर ठेवल्यानंतर दुसऱ्या एका घरी दागिन्यांचा डबा गरम करण्यासाठी ठेवला आहे, तो डबा काढून आम्ही पुन्हा परत येतो, अशी बतावणी या भामट्याने केली व ते दोघेही तेथून निघून गेले. काही वेळाने कुचनकार यांच्या पत्नीने डबा उघडून पाहिला असता, त्यातील सोन्याचे दागिने गायब होते.
फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच, किसन कुचनकार यांनी यासंदर्भात दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरुद्ध भादंवि ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)

दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे काही गुन्हेगार शहरात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे केवळ शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. कोणत्याही अनोळखी इसमाला घरात प्रवेश देऊ नये. अशा प्रकारचे गुन्हे करणारे संशयित कुठे आढळल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात त्याबाबत लगेच माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे.
- संदीप दिवाण,
जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

Web Title: Polished jewelry in the name of polishing