देशी कट्टा दाखवून पैसे लुटणारा पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST2021-07-22T04:18:37+5:302021-07-22T04:18:37+5:30
बल्लारपूर-राजुरा रोडवरील बामणी येथील निर्भय पेट्रोलपंपावर सोमवारी मध्यरात्री दोन जण दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या बाहण्याने गेले. यावेळी तेथील कर्मचाऱ्यास देशी ...

देशी कट्टा दाखवून पैसे लुटणारा पोलिसांच्या जाळ्यात
बल्लारपूर-राजुरा रोडवरील बामणी येथील निर्भय पेट्रोलपंपावर सोमवारी मध्यरात्री दोन जण दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या बाहण्याने गेले. यावेळी तेथील कर्मचाऱ्यास देशी कट्ट्याचा धाक दाखवून २६०० रुपये जबरीने हिसकावून घेतले. तसेच ५०० रुपयांचे पेट्रोल टाकून पैसे न देताच पसार झाले, अशी तक्रार प्रकाश महादेव वैद्य याने बल्लारपूर पोलिसांत केली होती. पोलिसांनी तक्रारीवरून कलम ३९२, ५०६ भादंवि आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, याच प्रकरणातील वर्णन केलेल्या व्यक्तींनी सिंदेवाही येथील पेट्रोलपंपावर देशी कट्ट्याचा धाक दाखवून १ लाख ९० हजार रुपये हिसकावून पसार झाल्याची घटना मंगळवारी घडली. मात्र यावेळी पोलिसांनी पाठलाग करताना ते चोरटे दुचाकी सोडून जंगलात पसार झाले होते. बल्लारपूर पोलिसांनी त्या दुचाकीची माहिती काढल्यानंतर दुचाकी तेलंगणा येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर संशयित म्हणून राजुरा येथील अनिल सकनारे याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सपोनि विकास गायकवाड आदींनी केली.